पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव, यादीतील क्रमांक, यादीचा भाग क्रमांक, मतदान केंद्र, बूथ क्रमांक यांची माहिती देणारी हेल्पलाईन शिवसेनेतर्फे सुरू करण्यात आली असून या सेवेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.
संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर, अभिनेता सुबोध भावे, शिवसेनेचे शहरप्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, आमदार गिरीश बापट, महादेव बाबर, माजी खासदार प्रदीप रावत, गटनेता अशोक हरणावळ, नगरसेवक हेमंत रासने, गणेश बीडकर, प्रशांत बधे, आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, परशुराम वाडेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
निवडणूक प्रचारासाठी पूर्वी भिंती रंगवल्या जात असत. भिंत रंगवण्याचा उपक्रम आजही सुरू आहे. फक्त या भिंती फेसबुकच्या आहेत. सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्या पाश्र्वभूमीवर मतदारांसाठी हेल्पलाईन हा शिवसेनेचा उपक्रम निश्चितच चांगला आहे, असे शिकारपूर यांनी यावेळी सांगितले.
मतदारांनी उदासीनता सोडून मतदान केले पाहिजे. अनेक नागरिक मतदान करत नाहीत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, असे सुबोध भावे म्हणाले.
मतदार यादीतील नावाचा शोध व अन्य माहितीसाठी सुरू करण्यात आलेल्या या हेल्पलाईनवरून माहिती मिळवण्यासाठी ६०१२९२९२, ६०१२९३९३ असे दोन क्रमांक देण्यात आले असून सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत ही माहिती घेता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of shivsena helpline
First published on: 30-03-2014 at 02:48 IST