पुणे : तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर परिसरात घडली. खून झालेल्या तरुणाचा मृतदेह हांडेवाडी-होळकरवाडी स्मशानभूमीजवळील मोकळ्या जागेत सापडला. तरुणाच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शाेध घेण्यात येत आहे.
हनीफ मुसा शेख (वय ३०, रा. कृष्णानगर, महंमदवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत हनीफ याचा भाऊ सगीर (वय ३४) याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीफ एका व्यावसायिकाकडे वाहनचालक म्हणून काम करत होता. होळकरवाडी स्मशानभूमीजवळील मोकळ्या जागेत एक तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती फुरसुंगी पोलिसांना मिळाली. त्यानंतर फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाची ओळख पटविली. हनीफ याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. खुनामागचे निश्चित कारण समजले नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खांडे तपास करत आहेत.
कोंढव्यात तरुणाचा खून
पुणे : कोंढव्यातील ज्योती हॉटेल चौकातील मोकळ्या जागेत एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. खुनामागचे कारण समजू शकले नाही. रघुनाथ रघुवीर परदेशी (वय ३०, रा. बोपोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशी मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत राहायला आहे. तो कोंढव्यात कशासाठी आला होता, तसेच त्याच्या खुनामागचे कारण काय आहे? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.