पुणे : आगामी महापालिका निवडणुकीतील वाढलेल्या मतदारांची संख्या लक्षात घेता शहरात चार हजार मतदार केंद्रांची आवश्यकता भासेल, असा अंदाज महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून व्यक्त करण्यात आला आहे. महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश झाल्याने मतदार केंद्रांची संख्या सहाशेने वाढणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक शाखेचे नियोजन सुरू झाले असून निवडणुकीच्या कामकाजासाठी ३५ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शुक्रवारी (२९ जुलै) आरक्षणाची प्रक्रिया निश्चित करण्यात येणार आहे. निवडणूक पावसाळ्यानंतर होईल, असा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मात्र निवडणुकीच्या दृष्टीने कामकाजाची लगबग महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून सुरू झाली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी ३५ हजार एवढे मनुष्यबळ लागणार आहे.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीवेळी शहरात ३ हजार ४०० मतदान केंद्रे होती. गेल्या पाच वर्षात महापालिकेच्या हद्दीत आसपासच्या ३४ गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेची हद्दही वाढली आहे. तसेच मतदारसंख्याही वाढली आहे. शहरातील ३४ लाख ५४ हजार ६३९ मतदार निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. ही बाब लक्षात घेता चार हजार मतदान केंद्रांची आवश्यकता भासणार आहे. त्यादृष्टीने ५८ प्रभागांची १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विभागणी करण्यात आली असून मतदान केंद्रांसाठी शाळा, शासकीय कार्यालये आणि अन्य जागांची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही येत्या काही दिवसांत दिले जाणार आहे.