पुणे : कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावी (आयएससीई) आणि बारावीच्या (आयएससी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात राष्ट्रीय स्तरावर दहावीचा निकाल ९९.४७ टक्के, तर बारावीचा निकाल ९८.१९ टक्के लागला. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९८.९४ टक्के, तर बारावीचा निकाल ९६.९३ टक्के लागला होता. त्यामुळे दोन्ही निकालांमध्ये वाढ झाली असून, राज्याचा दहावीचा निकाल ९९.९६ टक्के, तर बारावीचा निकाल ९९.७१ टक्के लागला.

सीआयएससीईतर्फे दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २८ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. दहावीची परीक्षा दोन लाख ४३ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यातील दोन लाख ४२ हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.३१ टक्के आणि मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६५ टक्के आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या दोन हजार ६९५ शाळांपैकी दोन हजार २२३ (८२.४८ टक्के) शाळांचा निकाल १०० टक्के लागला. दहावीची परीक्षा दोन हजार ५०३ केंद्रांवर घेण्यात आली होती.

हेही वाचा – “खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची; उद्धव ठाकरेंना राहुल गांधी समोर मुजरा…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका

बारावीची परीक्षा १२ फेब्रुवारी ते ४ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. बारावीची परीक्षा दिलेल्या ९९ हजार ९०१ विद्यार्थ्यांपैकी ९८ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात मुलींच्या तुलनेत मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक आहे. ५२.४२ टक्के मुले, तर ४७.१८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एक हजार ३६६ शाळांपैकी ९०४ (६६.१८ टक्के) शाळांचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेसाठी एक हजार २८५ परीक्षा केंद्रे होती.

हेही वाचा – बारामती लोकसभा मतदार संघात कडक बंदोबस्त, तीन हजार पोलीस बंदोबस्तास तैनात

राज्याचा विचार करता, दहावीचा निकाल ९९.९६ टक्के, तर बारावीचा निकाल ९९.७१ टक्के लागला. २६५ शाळांतून दहावीची परीक्षा दिलेल्या २८ हजार ५८८ विद्यार्थ्यांपैकी २८ हजार ५७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात १५ हजार ४१५ (९९.९४ टक्के) मुले, तर १३ हजार १६२ (९९.९९ टक्के) मुलींचा समावेश आहे. बारावीचा निकाल ९९.७१ टक्के लागला असून, परीक्षा दिलेल्या तीन हजार ८४० विद्यार्थ्यांपैकी तीन हजार ८२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात एक हजार ७३५ (९९.५४ टक्के) मुले, तर दोन हजार ९४ (९९.८६ टक्के) मुली आहेत. राज्याच्या दहावी आणि बारावीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक असल्याचे दिसून येते.