‘‘विचारांचे जागतिकीकरण होताना पाश्चात्त्य समीक्षेकडे पाठ फिरवण्याची चूक मराठी समीक्षकांनी केली. द. भि. कुलकर्णी यांनी मात्र पाश्चात्त्य समीक्षेकडे पाठ फिरवली नाही. असे असले तरी त्यांनी कोणत्याही साहित्यसिद्धांताची बांधिलकीही स्वीकारली नाही. स्वत:ची बांधिलकी स्वत:लाच असणे हे दभिंचे वेगळेपण आहे,’’ असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर यांनी व्यक्त केले.
डी. एस. कुलकर्णी फाउंडेशन, अक्षरधारा बुक गॅलरी आणि पुणेकर रसिक मित्र परिवारातर्फे ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी यांनी ८० व्या वर्षांत पदार्पण केल्यानिमित्त शिरवाडकर यांच्या हस्ते त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. पुणेरी पगडी आणि मानपत्र असे या सत्काराचे स्वरूप होते. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, डॉ. नीलिमा गुंडी, रसिका राठिवडेकर, विवेक सबनीस या वेळी उपस्थित होते.
शिरवाडकर म्हणाले, ‘‘पुष्कळ समीक्षक भारंभार लेखन करतात. पण दभिंचा मराठी वाचकावर कायमचा ठसा आहे. कोणत्याही साहित्यिक वर्तुळात शिरून प्रशंसेची देवाण-घेवाण करून मोठे होण्याच्या प्रवृत्तीपासून ते नेहमी दूर राहिले. समीक्षक सहसा नवीन लेखकांना स्वीकारत नाहीत. पण दभिंनी नवीन कविता आणि कादंबऱ्यांचे स्वागत केले. त्यांची समीक्षा म्हणजे केवळ परिचय नसतो. त्यांची स्वत:ची निश्चित दृष्टी लाभलेले ते सखोल विवेचन असते. याच कारणास्तव ते समीक्षक म्हणून अस्सल आणि अव्वल आहेत.’’
मानवजातीला प्रवृत्ती व निवृत्ती या दोन टोकांमध्ये सुवर्णमध्य साधणे शक्य होत नाही, असे सांगून द. भि. म्हणाले, ‘‘कोणत्याही गोष्टीत कुठलेतरी एकच टोक गाठायचे नसते, हे माझ्या लहानपणीच लक्षात येत गेले. हा सुवर्णमध्य ज्याचा त्याने शोधायचा असतो. केवळ प्राचीन किंवा केवळ अर्वाचीन साहित्याचे अनेक अभ्यासक मराठीत आहेत. साहित्याचा कालखंड किंवा त्यामागची जीवनप्रेरणा त्यांच्यासाठी महत्त्वाची असते. असा एकांगी विचार माझ्या मनात आला नाही. साहित्याची भाषा ही अर्थवलयांची भाषा असते. या अर्थवलयांतून वैश्विक अनुभूतीचा प्रत्यय येतो.’’ आजच्या काळात मराठीत साहित्यिकांची कमतरता भासत असल्याची खंत डी. एस. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.