राष्ट्रवाद, सुशासन आणि ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून विकास, शेवटच्या माणसाच्या विकासासाठी अंत्योदय या तीन मुद्दय़ांना प्राधान्य देत भारतीय जनता पक्षाने ‘इंडिया व्हिजन २०२५’ हा मसुदा तयार केला असून शनिवारी (८ मार्च) पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. महासत्तेचे उद्दिष्ट ठेवून सुखी, समृद्ध आणि शक्तिशाली हिंदुस्थान घडविण्याचे स्वप्न साध्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे गडकरी यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी गडकरी यांचे स्वागत केले. शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट या वेळी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, हा मसुदा तयार करण्याची जबाबदारी पक्षाने आपल्यावर सोपविली होती. या मसुद्यासाठी वेगवेगळ्या ६८ क्षेत्रांतील चारशे तज्ज्ञ व्यक्तींनी विविध क्षेत्रांत भाजपची भूमिका काय असावी यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. न्याय, शैक्षणिक, प्रशासकीय, करप्रणाली आणि पोलीस या क्षेत्रातील सुधारणांवर यामध्ये भर देण्यात आला आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना ग्राहकाला विविध प्रकारचे ३४ कर भरावे लागतात. यामध्ये सुचविण्यात आलेल्या नव्या करप्रणालीनुसार केवळ चार प्रकारचे कर भरावे लागतील. त्यामुळे महागाई कमी होणार असून सध्या असलेले १७ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न २५ लाख कोटी रुपयांवर जाईल. या मसुद्यामध्ये रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. आर्थिक संकटातून देश कसा वाचेल, अंतर्गत आणि बाह्य़ सुरक्षा या मुद्दय़ांवर सखोल विचार करण्यात आला आहे. हा देश श्रीमंत आहे. पण, जनता गरीब आहे. चुकीची धोरणे आणि बेजबाबदार प्रशासन यामुळे सरकार अयशस्वी ठरले आहे.