पुणे : प्रतिजैविके अर्थात अँटिबायोटिक औषधांचे अतिरेकी सेवन करणाऱ्या देशांमध्ये भारताचे स्थान अग्रक्रमावर असून त्यामुळे भविष्यात भारतीयांवर प्रतिजैविक औषधांचा शून्य परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकाने याबाबत शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. भारतातील ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून याचे दूरगामी परिणाम टाळायचे असल्यास प्रतिजैविक औषधांच्या सेवनाबाबत जनजागृती करण्याची गरज अधोरेखित करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार? माणिकराव ठाकरे म्हणाले, “काल नांदेडच्या बैठकीत…!”




अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठ आणि भारतातील पब्लिक हेल्थ फाउंडेशनतर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून भारतीयांकडून केल्या जाणाऱ्या प्रतिजैविक औषधांच्या सेवनाबाबतचे निष्कर्ष समोर आले आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) शिवाय म्हणजे ओव्हर द काऊंटर विकली जाणारी बहुतांश प्रतिजैविक औषधे आणि काही धोरणात्मक गोष्टी या प्रतिजैविक औषधांच्या मनमानी सेवनाचे प्रमुख कारण असल्याचे लॅन्सेटने म्हटले आहे. ‘डिफाईन्ड डेली’ डोस प्रकारातील प्रतिजैविक औषधांच्या सेवनाचा अभ्यास करण्यासाठी देशातील नऊ हजार प्रमुख वितरकांकडून माहितीचे संकलन करण्यात आले. २०१९ या वर्षांत भारतीयांकडून तब्बल ५०७१ दशलक्ष ‘डिफाईन्ड डेली डोस’चे सेवन करण्यात आले.
हे का होतेय?
साध्या औषधांनी बऱ्या होणाऱ्या दुखण्यांनाही अनेकदा जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर प्रतिजैविके लिहून देतात. ती औषधे नागरिक पुढे आपल्या मनाप्रमाणे घेत राहतात. रुग्णांकडून होणारी प्रतिजैविक औषधांची मागणी वाढली आहे.
गरज काय? जागतिक स्तरावर प्रतिजैविक औषधे निष्प्रभ ठरण्याचा धोका (अँटीबायोटिक रेझिस्टन्स) वाढत असताना भारतातील प्रतिजैविक औषधांच्या सेवनाचे सर्वाधिक प्रमाण म्हणजे धोक्याची घंटा असून त्यावर उपाय म्हणून औषधांच्या विक्रीबाबत नवीन नियमावली, मनमानी प्रतिजैविकांच्या सेवनाविरुद्ध जनजागृती निर्माण करणे यांबाबतची गरज अधोरेखित होत आहे.