रंगीबेरंगी, चमकणारे साबणाचे फुगे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यानाच भुरळ घालतात. याच 3bubble2फुग्यांची गंमत पुणेकरांना घेता येणार आहे. भारतातील पहिले ‘बबल कार्निव्हल’ पुण्यात होणार असून जगातील पंधरा बबल आर्टिस्ट त्यात सहभागी होणार आहेत.
जगातील अनेक देशांमध्ये साबणाच्या फुग्यांचा खेळ हा कलाप्रकार म्हणून ओळखला जातो. भारतात मात्र अद्याप ही संकल्पना रुजलेली नाही. भारतातील पहिले ‘बबल कार्निव्हल’ पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये जगातील पंधरा देशांतील ‘बबल आर्टिस्ट’ यांमध्ये सहभागी होणार आहेत. वेगवेगळ्या रासायनिक पाण्याचा वापर करून तयार केलेले फुगे, खाद्यपदार्थाचा वापर करून तयार केलेल्या, खाता येतील अशा फुग्यांची मजा या कार्निव्हलमध्ये घेता येणार आहे. या कार्निव्हलमध्ये फ्ली मार्केट, पपेट शो, जादूचे प्रयोग यांचाही समावेश आहे.
नऊ वेळा गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेले लंडन येथील बबल आर्टिस्ट सॅमसॅम बबलमॅन या कार्निव्हलमध्ये दहाव्या रेकॉर्डसाठी प्रयत्न करणार आहेत. याशिवाय ‘ऑस्कर ऑफ मॅजिक’ म्हणून ओळखले जाणारे मर्लिन अॅवॉर्ड विजेते इटलीचे मार्को झोप्पी सहभागी होणार आहेत. त्या दोघांचाही अध्र्यातासाचा ‘बबल शो’ होणार आहे. रोमानिया, लिथुनिया, स्पेन, रेइटी, सिंगापूर, मलेशिया, फिलीपाइन्स, फ्रान्स, इस्राईल, अर्जेन्टिना या देशांमधील कलाकार या कार्निव्हलमध्ये सहभागी होणार आहेत.
बालेवाडी येथील क्रीडा संकुलात २१ डिसेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात हे कार्निव्हल होणार आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये तालवाद्य वादक नीलेश परब आणि बासरी वादक अमर ओक यांची जुगलबंदी आणि साल्सा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्निव्हलसाठी २५० रुपये प्रवेशिका आहे. मिराकी इव्हेन्टस हे कार्निव्हल आयोजित करणार असून मिराकी इव्हेंट्सच्या भागीदार स्वाती पाटील यांनी याबाबत बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी मिराकी इव्हेंट्सचे क्रिएटिव्ह डायरेक्टर रोहित सातपुते, सयाजी हॉटेल्सचे उप-सर व्यवस्थापक सुजित गोपिनाथ आदी उपस्थित होते.