नाटक करण्याची झिंग, प्रयोग संपल्यावर भालबा केळकर आणि श्री. पु.भागवत यांच्यासमवेत पायपीट करताना घडलेले रात्रीच्या पुण्याचे दर्शन, दुकानाच्या पाटय़ा उलटीकडून वाचणारे माधव वाटवे, अशा आठवणी देणारे ‘रंगायन’चे पर्व हा माझ्यासाठी अनुभवाचा झिम्मा होता. आता एकांकात बसून केलेल्या लेखनाचे वाचन करून अपरिचित असलेल्या वाचकांनी दिलेला प्रतिसाद हा माझ्यासाठी अनुभवाचा नवा झिम्मा आहे. पाहता पाहता या ‘झिम्म्या’चेही सहा हजार प्रयोग झाले. हा झिम्मा अजूनही सुरूच आहे, अशी भावना ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी मंगळवारी व्यक्त केली.
पुणे नगर वाचन मंदिरातर्फे संस्थेचे अध्यक्ष मा. शं. सोमण यांच्या हस्ते विजया मेहता यांच्या ‘झिम्मा’ या आत्मकथनपर पुस्तकास ‘इंदिरा भालचंद्र पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ नाटय़समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे, श. ग. ठकार या प्रसंगी उपस्थित होते.
रंगायन पर्वाचा स्पर्श ज्याला झाला तो प्रत्येक जण कलाकार म्हणून तर घडलाच, पण हा स्पर्श त्याच्या कामातून, व्यक्तिमत्त्वातून, श्रद्धेतून दिसतो. ‘रंगायन’ ही नाटय़ाची वेगवेगळी क्षितिजे पाहण्याची संधी म्हणूनच स्थापन झाली. संवेदनशीलता वाढविण्यासाठी इतर कलांशी संवाद झाला पाहिजे ही आमची भूमिका होती. हा झिम्मा मी बारा वर्षे अनुभवला असे सांगून विजया मेहता म्हणाल्या,‘‘झिम्मा पुस्तक प्रकाशित होऊन नऊ महिने झाले. या कालावधीत माझे पुन्हा प्रशिक्षण झाले. पुस्तक लिहिताना कंटाळा आला होता. सहजपणे संवाद साधणे हे आम्हा नाटकवाल्या मंडळींचे काम. प्रेक्षक हा त्या उत्सवाचा भाग असतो. समोर दिसणारा प्रेक्षक टाळ्या वाजवतो तेव्हा बरे वाटते. माझे अनुभव कोण वाचणार हा प्रश्न होता. पण, वाचकांचीसुद्धा झिंग असते हे जाणवले. एवढे ४०० पानांचे पुस्तक वाचून वाचकांनी लिहिलेले पत्र मला नवी िझग तर देतेच,पण कोणाही माहीत नसलेला माणूस हा माझा स्नेही होतो. असा सहा हजार प्रयोगांचा झिम्मा मी अनुभवला आहे. वाचकांनीही हा झिम्मा अजून सुरूच ठेवला आहे.’’
डॉ. वि. भा. देशपांडे यांनी आपल्या मनोगतातून विजया मेहता या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. अरिवद रानडे यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.