– १०० ऐवजी आता ६० सेकंदाला प्रतीक्षा भाडे आकारणी
– जिल्हा परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता
– रिक्षा संघटनांकडून स्वागत, तर प्रवासी संघटनांचा विरोध
– रात्रीच्या प्रवासाची भाडेवाढ मात्र टळली
सिग्नलला किंवा वाहतुकीच्या कोंडीमध्ये रिक्षा थांबली तरी रिक्षाचा मीटर मात्र सुरू असतो. १०० सेकंद रिक्षा थांबली की १०० मीटर अंतराचे भाडे मीटरमध्ये पडते. मात्र, आता हा प्रतीक्षा कालावधी १०० सेकंदांवरून ६० सेकंद करण्यात आला आहे. त्यामुळे ६० सेकंदालाच १०० मीटर अंतराचे भाडे द्यावे वागणार असल्याने पुणेकरांवर हा अप्रत्यक्ष भाडेवाढीचा बोजा पडला आहे. जिल्हा परिवहन प्राधिकरणाच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये रिक्षाचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. रिक्षा संघटनांनी स्वागत केले असले, तरी प्रवासी संघटनांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. रात्रीच्या प्रवासाचे अतिरिक्त भाडे २५ टक्क्य़ांवरून पूर्ववत ५० टक्के करण्याची मागणी मात्र प्राधिकरणाने फेटाळून लावली आहे.
रिक्षाचे रात्रीचे अतिरिक्त भाडे सध्या २५ टक्के आहे. हे भाडे पूर्वी पन्नास टक्के होते. हे भाडे पूर्ववत करण्याबरोबरच रिक्षाचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात आली होती. प्राधिकरणाने यापूर्वी याबाबत रिक्षा संघटनांची बाजू ऐकून घेतली. त्याचप्रमाणे प्रवासी प्रतिनिधींच्या विरोधाचे मुद्देही जाणून घेतले होते. त्यानुसार सोमवारी प्राधिकरणाची बैठक झाली. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, अमर पाटील आदी या बैठकीला उपस्थित होते.
प्रतीक्षा कालावधीच्या आकारणीमध्ये रिक्षा चालक व प्रवासी दोघांनाही झळ बसते. रिक्षाचे भाडे सीएनजीवर ठरविण्यात आले आहे व सीएनजीच्या दरात कपात झालेली नाही. पुढील भाडेवाढ मे महिन्यामध्ये विचारात घेतली जाणार आहे. मात्र, त्या कालावधीत रिक्षा चालकांचे नुकसान होऊ नये, असे कारण देत प्राधिकरणाने रिक्षाचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यास बैठकीत मंजुरी दिली. कालावधी कमी केल्याने रिक्षाच्या मीटरमध्येही तांत्रिक बदल (कॅलिब्रेशन) करावे लागणार आहेत. हे कॅलिब्रेशन करून घेण्यासाठी प्राधिकरणाने रिक्षा चालकांना पुढील भाडेवाढीपर्यंत मुदत दिली आहे.
रिक्षा व टॅक्सीच्या भाडेवाढीच्या सूत्राबाबत हकीम समितीने दिलेल्या शिफारशी शासनाने मान्य केल्या आहेत व त्यानुसारच रिक्षाचे रात्रीचे अतिरिक्त भाडे ठरविण्यात आले होते. त्यामुळे या भाडय़ामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही, असे सांगून प्राधिकरणाने रिक्षा चालकांची ही मागणी फेटाळून लावली. या निर्णयामुळे मात्र प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
‘‘रिक्षाचा प्रतीक्षा कालावधी कमी करताना परिवहन प्राधिकरणाने प्रवाशांच्या मताला किंमत दिलेली नाही. हकीम समितीच्या सूत्रानुसार कोणत्याही भाडेवाढीबाबत १ मेपर्यंतची मर्यादा आहे. त्यामुळे ही अप्रत्यक्ष भाडेवाढ नियमानुसार नाही. सिग्नल किंवा वाहतुकीमध्ये रिक्षा थांबते, त्यात प्रवाशांचा कोणताही दोष नसतो. त्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना देणे योग्य नाही. प्रतीक्षा कालावधी बदलल्यामुळे आता मीटरच्या यंत्रणेत बदल (कॅलिब्रेशन) करावे लागतील, तरच प्रत्यक्ष द्यायचे भाडे मीटरमध्ये दिसेल. अन्यथा प्रवासी व रिक्षा चालकांमध्ये वाद होतील. त्यामुळे कॅलिब्रेशन झाल्याशिवाय प्रतीक्षा कालावधीचे वाढीव भाडे घेण्यास परवानगी देऊ नये.’’
– विवेक वेलणकर
अध्यक्ष, सजग नागरिक मंच.
‘‘प्रतीक्षा कालावधीची मागणी मान्य झाल्यामुळे रिक्षा चालकांनी आता प्रवाशांच्या तक्रारींना वाव देऊ नये. भाडे घेण्यास नकार देऊ नये. आपल्याला न्याय मिळाला असल्याने आता प्रवाशांनाही न्याय दिला पाहिजे, अशी आमची भावना आहे. आमची मागणी हकीम समितीच्या सूत्रानुसारच आहे. एक मागणी पूर्ण झाली असली, तरी रात्रीच्या अतिरिक्त भाडय़ाची मागणी पूर्ण होणे अपेक्षित होते. ग्राहकांवर बोजा नको म्हणून रात्रीचे अतिरिक्त भाडे ५० टक्के नव्हे, तर किमान ३० टक्के वाढावे, अशी आमची अपेक्षा होती.’’
– नितीन पवार
निमंत्रक, रिक्षा पंचायत
‘‘रात्रीची अतिरिक्त भाडेवाढ नाकारताना मुंबईतील परिस्थितीचा विचार करण्यात आला आहे. पुणे व मुंबईची तुलना करणे चुकीचे आहे. मुंबईमध्ये रात्री कोणत्याही वेळेला रिक्षाला भाडे मिळू शकते. पुण्यात तशी स्थिती नाही. रात्री भाडे मिळत नाही. रात्री सेवा देणे हा रिक्षा चालकांचा ओव्हरटाईमच असल्याने रात्रीचे अतिरिक्त भाडे ५० टक्के होणे गरजेचे आहे.’’
– प्रदीप भालेराव
रिक्षा फेडरेशन