• केंद्रीय रस्ता सुरक्षा समितीकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी
  • दंडात्मक कारवाईबरोबर परवाना निलंबित करण्याच्या सूचना

वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. बेशिस्त वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येतो. त्यानंतर संबंधित वाहनचालकाचा परवाना निलंबित करण्यात येतो. वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारचे प्रस्ताव पाठविण्याचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने नवी दिल्लीतील उच्चस्तरीय रस्ता सुरक्षा समितीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरातील वाहतूक पोलीस बेशिस्त वाहनचालकांवर फक्त दंडात्मक कारवाई करतात. यापुढील काळात दंडात्मक कारवाईबरोबरच बेशिस्त वाहनचालकांचा परवानादेखील निलंबित करा, अशा स्पष्ट सूचना उच्चस्तरीय सुरक्षा समितीकडून देशभरातील पोलिसांना देण्यात आल्या आहेत. अपघाती मृत्यूचे वाढते प्रमाण तसेच नियम धुडकावण्याच्या वाहनचालकांच्या प्रवृत्तीला वेसण घालण्यासाठी केंद्रीय रस्ता सुरक्षा समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत देशातील सर्व राज्यांतील पोलिसांना बेशिस्त वाहनचालकांवर सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले.

नियम धुडकावणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी  निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीकडून देशातील सर्व राज्यांना रस्ते अपघात तसेच सुरक्षिततेबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात येतात.

दिल्लीत पार पडलेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्राचे मुख्य सचिव उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांत वाढलेले अपघात तसेच अपघातात झालेल्या मृत्यूचे प्रमाण या बाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

नियमभंगाचे प्रकार

  • भरधाव वाहने चालविणे.
  • वाहतूक नियंत्रक दिवा (सिग्नल) न जुमानणे.
  • चारचाकी वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक.
  • मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक.
  • मद्य पिऊन वाहन चालविणे.
  • वाहन चालविताना मोबाइल संभाषण.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी; कारवाईचा अहवाल सादर करा

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याबरोबरच त्यांचा परवाना निलंबित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यापुढील काळात देशभरातील वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांचा परवाना निलंबित केल्याच्या कारवाईचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीला सादर करण्याच्या स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्या.

वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. बेशिस्त वाहनचालकांकडून दंडदेखील गोळा करण्यात येतो. यापुढील काळात दंडात्मक कारवाईबरोबर वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्यासाठी पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अधिकाधिक प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे. तशा सूचना राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाकडून (वाहतूक) राज्यभरातील पोलिसांना देण्यात आल्या आहेत. वाहन परवाना निलंबित करण्याची कारवाई केल्यास बेशिस्त वाहनचालकांना जरब बसेल.   – विजय पाटील, पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालय, मुंबई</strong>

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indiscipline driver in pune
First published on: 23-11-2018 at 00:40 IST