सहकारात तसेच साखर कारखान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असून जिथे-तिथे लूटालूट सुरू आहे, अशी टीका खासदार गजानन बाबर यांनी पिंपरीत केली. अन्न सुरक्षा हे ढोंग असून खुर्ची वाचवण्यासाठी केलेले उद्योग आहेत, असेही ते म्हणाले.
पिंपरीतील इंद्रायणी बँकेचा इंद्रायणी पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुज्जफ्फर हुसेन यांना देण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. माजी प्र-उपकुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर, बँकेचे संस्थापक अॅड. एस. बी. चांडक, अध्यक्ष संदीप शेवडे आदी उपस्थित होते. या निमित्ताने राहुल सोलापूरकर यांनी हुसेन यांची प्रकट मुलाखत घेतली. बाबर म्हणाले, पूर्वी बँकांना संचालक मिळायचे, आता नवीन नियमांमुळे ते मिळत नाहीत. महाविद्यालयांमध्ये बनावट विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असून परदेशी विद्यापीठेही त्यात आहेत. खोटय़ा प्रमाणपत्रांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. सरकार कोणाचेही आले तरी कामधंद्याशिवाय दोन वेळचे अन्न मिळणार नाही. सन्मानाने जगण्यासाठी कष्टाला पर्याय नाही, असे ते म्हणाले. डॉ. नवलगुंदकर म्हणाले, उंचीचे ज्ञान व राष्ट्रभक्ती असलेल्या हुसेन यांचा सत्कार म्हणजे कार्यकर्तृत्वाचा सत्कार आहे, अशा आदर्शाचे अनुकरण व्हायला हवे. आपल्या तरुणाईत कमालीची बुद्धिमत्ता आहे. जगावर स्वामित्व मिळवण्याची धमक आहे. त्यांच्यापुढे योग्य आदर्शाची गरज आहे. पाश्चिमात्यांचे अनुकरण नको. त्यात दोष आहेत. राष्ट्रावर, समाजावर भक्ती असली पाहिजे. माणसातील माणूस जागा करणे याला मोठे मूल्य आहे. समाजाचा उत्कर्ष साधता आला पाहिजे. सत्य निरखावे, विवेक वापरावा आणि पुढे चालावे. प्रास्ताविक अॅड. चांडक यांनी केले. शेवडे यांनी आभार मानले. सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.