जमिनींना आलेला सोन्याचा भाव व झटपट पैसा मिळविण्याच्या नादात मावळमध्ये जमीन खरेदी- विक्रीच्या व्यवहारामधील फसवणुकीचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. एकाच जमिनीची अनेकांना विक्री करण्याचे प्रकार होत आहेत. मागील पंधरा दिवसांमध्ये लोणावळा पोलिसांकडे अशा प्रकारच्या दोन मोठय़ा प्रकरणांची नोंद झाली आहे. वडगाव मावळ ठाण्यातही बहुतांश तक्रारी याच प्रकरणाच्या आहेत. जमिनीच्या काही व्यवहारांसाठी पुणे व मुंबईमधून मोठय़ा प्रमाणावर काळा पैसा मावळात येत असल्याचेही वास्तव आहे. जमिनीबाबत गुन्हे दाखल झाल्यास आरोपींकडून मोठी आर्थिक तडजोड होत असल्याने त्यात अनेकजण हात ओले करून घेत आहेत.
मावळ तालुका हा पुणे व मुंबई या शहरांच्या मध्यावर आहे. त्यामुळे या शहरातील बडय़ा मंडळींकडून मावळ व लोणावळा परिसरातील जमिनीमध्ये पैसा गुंतवला जातो. या भागामध्ये मागील अनेक वर्षांपासून जमीन खरेदी- विक्रीचा व्यवहार तेजीत आहे. त्यामुळे या भागामध्ये जमिनीच्या व्यवहारामध्ये दलालांची संख्याही भरमसाठ वाढली आहे. काही मंडळी प्रामाणिकपणे व्यवसाय करीत असली, तरी मागील काही दिवसांपासून या व्यवहारामध्ये मोठय़ा प्रमाणावर अपप्रवृत्तींचाही शिरकाव झाला आहे. झटपट पैसा मिळविण्याच्या नादामध्ये जमिनीचे बोगस व्यवहार करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. एकाच जागेची अनेकांना विक्री करणे, मूळ मालकाच्या जागी बोगस व्यक्ती उभी करून जमिनीची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. हे करीत अलताना अनेक वेळा ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पैशाचे आमिष दाखवून घराघरांमध्ये वाद लावण्याचे प्रकारही घडले आहेत.
जमिनीची खरेदी-विक्री करताना मोठय़ा प्रमाणावर काळा पैसाही वापरला जात आहे. जमिनीची शासकीय दराने असलेली किंमत धनादेशाच्या स्वरूपाने दिली जाते व उर्वरित रक्कम मात्र रोखीने देण्यात येते. रोखीने देण्यात येणारी ही रक्कम बहुतांश वेळा काळा पैसा असतो. जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांकडून उर्वरित रक्कम रोखीने देण्याचाच आग्रह असतो. कारण एखादे बोगस प्रकरण उघड झाले, तर जमीन खरेदी करणाऱ्याला केवळ कागदोपत्री दाखविलेली व धनादेशाद्वारे दिलेली रक्कमच परत मिळते. त्यामुळे सहाजिकच गुन्हेगारांचा फायदा होतो. गुन्हेगारांना कायद्याचा वचक राहिला नसल्याने केवळ फसवणूकच नव्हे, तर जमिनीच्या व्यवहारातून गुन्हेगारी टोळ्या निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
दुय्यम निबंधकांकडून सर्रास नोंदणी
शेतकरी किंवा सर्वसामान्य नागरिक काही कामासाठी शासकीय कार्यालयामध्ये गेल्यास त्याला गरगरा फिरायला लावणारी यंत्रणा दलालांचे काम मात्र क्षणार्धात करीत असल्याचे चित्र पहायला मिळते. कागदपत्रांची कोणतीही पडताळणी न करता दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दलालांची कामे होतात. त्यातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. कागदपत्र तपासण्याचा आम्हाला अधिकार नाही, असे सांगत काही घटना घडल्यास दुय्यम निबंधक कार्यालय अंग झटकत असल्याचेही अनेक प्रकार घडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘मागील काही दिवसांपासून जमीन खरेदी- विक्रीच्या व्यवहारामध्ये गैरप्रकार वाढले आहेत. जमीन खरेदी करताना सर्व कागदपत्र व इतर दस्तऐवज पडताळून पहावेत. खात्री पटल्याशिवाय जमीन खरेदी करू नये. त्याचप्रमाणे ज्यांच्या नावे जागा आहेत, त्यांनी किमान सहा महिने ते वर्षांनी जमिनीचे सातबारे काढून जमीन आपल्याच नावे आहे, याची खात्री करावी. त्यातून गैरप्रकारांना आळा बसू शकेल. काही चुकीचे घडते आहे, असे वाटल्यास त्याबाबत तातडीने तक्रार नोंदवावी.’’
– आय. एस. पाटील, पोलीस निरीक्षक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instant money mawal network fraudulent land
First published on: 24-11-2015 at 03:27 IST