पुणे : मध्य भारतासह महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट सुरू झाली असून, या भागांसह मराठवाडय़ात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चंद्रपूर येथे राज्यातीलच नव्हे, तर देशातील उच्चांकी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद बुधवारी झाली.
हिमाचल प्रदेशापासून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रापर्यंत सध्या उष्णतेची लाट आहे. या सर्व भागात हवामान कोरडे असून, आकाश निरभ्र आहे. त्यामुळे तापमानाचा पारा वाढत आहे. उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. परिणामी महाराष्ट्रात तापमान वाढत चालले आहे. ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार आहे. राज्यातील सध्याच्या तापमानात आणखी काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे. या कालावधीत कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात सर्वच भागात कमाल तापमान ४० अंशांपुढे आहे. चंद्रपूर, अकोला, नागपूर, वाशिम, वर्धा आदी जिल्ह्यांचा पारा ४२ ते ४४ अंशांपर्यंत पोहोचला आहे. या विभागात आणखी तीन दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहणार आहे. मराठवाडय़ातही कमाल तापमान ४० ते ४१ अंशांवर पोहोचले आहे. ३१ मार्चपासून पुढे तीन दिवस या विभागात उष्णतेची लाट येणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आदी भागांत तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. या विभागात दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. मुंबई परिसरासह कोकणात कमाल तापमान सरासरीपुढे आहे.
उष्णतेची लाट कुठे?
राज्याच्या सर्वच विभागांत पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार आहे. जळगाव, नगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आदी जिल्ह्यांत प्रामुख्याने पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट तीव्र असणार आहे.
कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
चंद्रपूर ४४.२, अकोला ४३.२, अमरावती ४१.८, बुलढाणा ३९.८, ब्रह्मपुरी ४१.८, गोंदिया ४१.५, नागपूर ४२.१, वाशिम ४२.५, वर्धा ४२.८, औरंगाबाद ४०.०, परभणी ४१.३, नांदेड ४१.६, पुणे ३९.५, कोल्हापूर ३९.६, महाबळेश्वर ३३.१, नाशिक ३७.७, नगर ३८.८, सांगली ४०.३, सातारा ३९.७, सोलापूर ४२.८, मुंबई ३४.२, सांताक्रुझ ३४.१, अलिबाग ३३.५, रत्नागिरी ३३.९
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2022 रोजी प्रकाशित
राज्यात उन्हाच्या झळा तीव्र; चंद्रपूरचा पारा ४४.२, देशातील उच्चांकी तापमानाची नोंद
मध्य भारतासह महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट सुरू झाली असून, या भागांसह मराठवाडय़ात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-03-2022 at 03:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intense heat wave state chandrapur mercury 44 2 highest temperature recorded country amy