पुणे : २० मे २०२५. वेळ दुपारी ३ वाजताची. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात दिमाखात उभ्या असलेल्या ‘इंटर युनिव्हर्सिटी फॉर ॲस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स’ अर्थात ‘आयुका’मध्ये ही दुपारही इतर दिवसांसारखीच; अध्यापनाची, संशोधनाची, भरपूर कामाची… एरवी संस्थेच्या संस्थापकाचे निधन झाल्यावर सुटी द्यायची प्रथा पडलेल्या आपल्या व्यवस्थेत असेही होऊ शकते, हे यातील वेगळेपण!

ते का घडू शकले, या प्रश्नाचे उत्तर ‘आयुका’च्या संस्थापकाने, म्हणजे डॉ. जयंत नारळीकरांनी दोनच महिन्यांपूर्वी लिहिलेल्या ‘ब्लॉग’मध्ये सापडते. २४ मार्च २०२५ च्या ‘ब्लॉग’मध्ये ते लिहितात, ‘संस्थापकाने संस्थेच्या रुजण्यात भलेही मोठे योगदान दिले असेल, पण संस्थापक तेथून बाजूला झाल्यानंतर ती संस्था कशी काम करते, यातच संस्थेच्या यशाची खरी कसोटी होत असते…’ ज्या संस्थेचे रोपटे लावून तिला अक्षरश: आपल्या मुलाप्रमाणे ज्यांनी वाढवले, त्या डॉ. जयंत नारळीकर यांनी घालून दिलेल्या शिस्तीनुसार ‘आयुका’चे काम मंगळवारीही नेहमीसारखेच सुरू राहिले आणि ही कसोटी त्यांनी पार केली. नारळीकर यांचे निधन झाल्याची बातमी सर्व प्राध्यापक, संशोधक, कर्मचारीवर्गाला कळवली गेली. पण, त्यांनी सुरू केलेले काम अखंडपणे सुरू राहिले पाहिजे, हीच भावना ठेवून त्यांनी ‘घडविले’ल्या या संस्थेने काम सुरू ठेवून त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.

‘‘आयुका’त सध्या ‘समर स्कूल’ हा उपक्रम सुरू आहे. खगोलभौतिकी आणि खगोलशास्त्र शिकण्यासाठी पदार्थविज्ञान आणि गणितातील कोणत्या संकल्पना माहीत असायला हव्यात, शिकायला हव्यात, याची पूर्वतयारी या उपक्रमात करून घेतली जाते. देशभरातील विज्ञान विषयाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यासाठी येतात. त्यांच्या वेळापत्रकात मंगळवारी बदल नव्हता. इतर सर्व विभागही सुरूच होते,’ असे ‘आयुका’च्या विज्ञान लोकप्रसार कार्यक्रमाच्या चमूने सांगितले.

‘आयुका’ सध्या ‘आदित्य एल-१’ सूर्यमोहिमेतही सहभागी आहे. त्यासाठीच्या ‘सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’ने टिपलेल्या चालू वर्तमानातील प्रतिमा संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्याचे कामही मंगळवारी नेहमीप्रमाणे सुरू होते. वेळेवर आधारित अगदी नेमक्या मोजणीसाठी तयार होत असलेल्या ‘प्रीसिजन क्वांटम मेझरमेंट क्लॉक’च्या, अर्थात ‘पीक्यूएम लॅब’च्या कामातही खंड पडला नाही आणि काही प्राध्यापकांनी सुरू केलेल्या प्रकल्पांवरील संशोधनातही थांबा आला नाही…

‘यशस्वी संस्था उभारलेल्यांना तिचे नेतृत्व करत राहायला आवडते, पण योग्य वेळ आल्यावर इतरांना जबाबदारी दिलेले आणि नंतर दूर अंतरावरून तिची प्रगती पाहणारे अधिक भाग्यवान असतात. भगवद्गीतेतील कर्मयोग असाच दिमाखदार निर्गमनाचा मार्ग दाखवतो…’ असे नारळीकरांनी २४ मार्चच्या त्या ब्लॉगचा शेवट करताना लिहिले असून, या अखेरच्या ब्लॉगचे शीर्षक आहे, ‘बीयाँड द ब्ल्यू प्रिंट : आयुकाज् ट्रू टेस्ट!’ ‘आयुका’ मंगळवारी या कसोटीवर खरी उतरली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विज्ञान दिनी उत्तरे आणि प्रश्नही! डॉ. जयंत नारळीकर

‘आयुका’तील विज्ञान दिनाचा कार्यक्रमाचा सहसा चुकवत नसत. या दिवशी उपस्थित विद्यार्थी आणि विज्ञानात रस असणाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, त्यांच्याशी संवाद साधणे त्यांना आवडत असे. यंदाही २८ फेब्रुवारीला प्रकृती फारशी बरी नसतानाही ते कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘मॅथेमॅटिक्स विदाउट नंबर क्रंचिंग’ असा विषय घेऊन त्यांनी एक सादरीकरणही केले. या वेळी सुरुवातच करताना ते म्हणाले, की आज मी फक्त तुमच्या प्रश्नांना उत्तरे देणार नाही, तर तुम्हालाही प्रश्न विचारणार आहे. पुढे जवळपास पाऊण तास हा कार्यक्रम रंगत गेला, असे विज्ञान लोकप्रसार कार्यक्रमाच्या चमूने सांगितले.