पाचवीचे १६.९९ टक्के, आठवीचे ११.३९ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात पाचवीचे ५७ हजार ३३२, आठवीचे २३ हजार ९६२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. गुणपडताळणीसाठी ५ डिसेंबपर्यंतची मुदत देण्यात आली असून, गुणपडताळणी अर्ज निकाली काढून अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पाचवीसाठी ३ लाख ८८ हजार ५१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ३ लाख ३७ हजार ३७० विद्यार्थ्यांपैकी ५७ हजार ३३२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. पाचवीचे १६.९९ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, तर आठवीच्या ६ लाख ३२ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ५ लाख ४७ हजार ७०८ विद्यार्थ्यांपैकी ८१ हजार २९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. आठवीचे ११,३९ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. https://www.mscepune.in/ या संकेतस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमधून आणि शाळांना त्यांच्या लॉगिनमधून निकाल पाहता येईल. गुणपडताळणीसाठी ५ डिसेंबपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा लागेल. गुणपडताळणीसाठी प्रत्येक विषयाला ५० रुपये शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. ऑनलाइन गुणपडताळणी अर्ज दाखल झाल्यापासून ३० दिवसांत निकाली काढून अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.