पुणे : फिरोदिया कुटुंब हे उद्योजकांचं कुटुंब असल्यामुळे उद्योगाचं बाळकडूच घरात होतं, पण त्याचबरोबर देशाच्या आणि काळाच्या गरजा ओळखून काम करा, हे माझ्या आजोबांचे संस्कार होते. संपूर्ण जग आज हवामान बदलांबाबत चिंतेत असताना मी पर्यावरणपूरक वाहनांच्या उद्योगात काम करणं स्वाभाविक होतं.. हे मनोगत आहे कायनेटिक ग्रीनच्या सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांचं.
कायनेटिक उद्योग समूहामुळे वाहन निर्मिती क्षेत्रात फिरोदिया कुटुंबाचा दबदबा आहे. ‘लोकसत्ता’शी बोलताना सुलज्जा म्हणाल्या,की आजच्या तरुण पिढीला स्मार्ट आणि आधुनिक तंत्रज्ञान देतानाच अजिबात प्रदूषण न करणारी वाहनं निर्माण करणं महत्त्वाचं वाटलं. कायनेटिक ग्रीन या कंपनीची पहिली कर्मचारी मी. इतर सगळ्यांची निवड मी केली. हे करताना एक नक्की होतं, जे करायचं ते सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात असेल असं आणि संपूर्ण पर्यावरण पूरक करायचं. त्यामुळेच पर्यटन क्षेत्राला उपयुक्त गोल्फ कार्स, रिक्षा आणि ई-सायकल्सची निर्मिती केली. ती करताना नव्या पिढीची तंत्रज्ञान, गॅझेट याबाबतची आवड लक्षात ठेवली. त्यातून या उत्पादनांना मागणी निर्माण झाली. तरुण पिढीला त्यांच्या आवडीचं काही तरी देतानाच, काही वर्षांनंतर त्यांना एक चांगलं पर्यावरण देणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे, याच भावनेतून ही धडपड आहे.
सुलज्जा सांगतात,की वाहन उद्योगाच्या क्षेत्रात महिलांचं प्रमाण कमी आहे.
ते दहा टक्केही नाही. मात्र, कायनेटिक ग्रीनला आवश्यक बाबींचा पुरवठा करणाऱ्या कायनेटिकच्या इतर कंपन्यांमध्ये शंभर टक्के महिला आहेत. त्यामुळे कायनेटिक ग्रीनला त्यांचा हातभार आहेच. आयुष्यात घेतलेल्या ‘ब्रेक’नंतर ती करिअरमध्ये मागे पडण्याची शक्यता असते. याला मीही अपवाद नाही. मुलाच्या जन्मानंतर पूर्ण वेळ त्याला द्यावा असं वाटलं होतं, पण, करिअर व घर दोन्ही निवडून मी पुढे जायचं ठरवलं. घर व मुलांसाठी करिअर सोडण्याची गरज नसते. ते कायम निवडता आलं पाहिजे.