पिंपरी महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची आदिवासी विकास विभागात नाशिकला बदली झाली आहे. सुमारे २ वर्षे आयुक्तपदी राहिलेल्या जाधव यांच्या कारकिर्दीत शहराला स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला. बीआरटी रस्ते, २४ तास पाणीपुरवठय़ाच्या पहिल्या टप्प्याचा विषय, पर्यायी पाणीपुरवठय़ाचा प्रस्ताव त्यांच्या कारकिर्दीत मार्गी लागला. अल्पावधीत विकसित झालेल्या व ‘बेस्ट सिटी ते क्लीन सिटी’चा वेगवान प्रवास करणाऱ्या िपपरी-चिंचवड शहराचे भवितव्य निश्चितपणे चांगले आहे, त्यासाठी यापुढेही अशाच पद्धतीने नियोजनबद्ध विकास व्हायला हवा.. अशी अपेक्षा राजीव जाधव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कालावधी पूर्ण होण्याआधीच बदली झाली असे वाटते का?
सरकारी नोकरी करताना बदली नियमितपणे होतच असते. येथे आलो म्हणजे कुठेतरी बदली होणारच होती. २४ महिन्यांची कारकीर्द झाली, ती अतिशय चांगली राहिली. अनेक कामे करता आली. दोन्ही वर्षांत ८० टक्के बजेट मार्गी लावले. मोठय़ा प्रमाणात कामे झाली. महापालिकेचे ६०० कोटी रूपये वाचवू शकलो. सातत्याने बैठका घेतल्या. एखादा दिवस अपवाद असेल, ज्या वेळी सहापेक्षा कमी बैठका झाल्या असतील. त्याद्वारे वेगाने कामे होत राहिली. शहराची आतून-बाहेरून संपूर्णपणे माहिती झाली, शहराशी जोडला गेलो.
आपल्या कार्यकाळातील ठळक कामे कोणती?
शहरात २२ किलोमीटर लांबीचे बीआरटीचे रस्ते झाले. बीआरटीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुणे व िपपरीसाठी बीआरटी वाहतूक महत्त्वाची आहे. पिंपरीत १०० किलोमीटर बीआरटी व वातानुकूलित बसचे नियोजन आहे. तसे झाल्यास भविष्यात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटू शकेल. २४ तास पाणीपुरवठय़ाचे नियोजन असून त्यादृष्टीने पहिल्या टप्प्याचे काम मार्गी लागले आहे. ४० कोटींची तरतूद करून पाणीपुरवठय़ाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली असल्याने भविष्यात पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही.  केंद्राने व राज्याने शहराच्या स्वच्छतेची दखल घेऊन ‘स्वच्छ शहर’ म्हणून कौतुक केले, आता ते टिकवण्यासाठी जबाबदारी वाढली आहे. शहरातील दोन हजार भूखंड स्वच्छ केले. दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवली जाते. यापुढे नदीकाठही स्वच्छ ठेवणार आहे. साई चौक, वाय जंकशन, कस्पटे वस्ती आदी रस्त्यांमधील मोठे अडथळे दूर केले. गॅमन कंपनीचा रखडलेला तसेच केएसबी चौकातील पुलाचे काम मार्गी लावले. दापोडीच्या हॅरिस ब्रीजला समांतर पुलाच्या कामाची सुरूवात झाली. दिघी-आळंदी, नाशिकफाटा ते मोशी, भक्ती-शक्ती ते मुकाई रस्ते मार्गी लागले. द्रुतगती महामार्ग थेट शहराशी जोडला गेला असून दापोडीतून काही मिनिटात तेथे पोहोचता येते. सहज सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न केला. पक्षातीत आणि सर्वाना बरोबर घेऊन काम केले. फाईली तुंबवल्या नाहीत. सर्वोच्च भरती केली, पारदर्शक पध्दतीने पदोन्नती केली. निलंबन तथा कठोर कारवाई करणे टाळून प्रशासनाकडून काम करवून घेतले. लोकांमध्ये मिसळून लोकप्रतिनिधींशी जुळवून घेत काम केले.
काही कामे वा प्रकल्प करायचे राहिले, असे वाटते का?
पिंपरी महापालिकेला स्मार्ट सिटी अभियानात समाविष्ट करण्यात आले नाही, याची कायम खंत राहील. वास्तविक, या अभियानासाठी आवश्यक सर्व निकषांमध्ये िपपरी-चिंचवड बसत होते. मात्र, कोणत्या कारणावरून डावलले, हे उमगू शकले नाही. मुळातच सुंदर असलेल्या या शहराचा जर त्यात समावेश झाला असता तर निश्चितपणे आनंद झाला असता.
शहरापुढील आव्हाने कोणती आहेत?
शहरातील पाच महत्त्वाचे विषय आहेत, त्यासाठी ‘पंचमहाभूते’ हा शब्दप्रयोग वापरावासा वाटतो. रेडझोन, बफर झोन, निळी रेषा (ब्ल्यू लाईन), अनधिकृत बांधकामे, शास्तीकर हे प्रश्न मार्गी लागायला हवेत. ‘रेडझोन’चा विषय केंद्राकडे आहे. शासनाने ‘बफर झोनचा’ विषय मान्य करण्याचे ठरवले आहे. अनधिकृत बांधकामांचा विषय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. निळी रेषेच्या विषयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview with pcmc comm rajiv jadhav
First published on: 30-04-2016 at 03:25 IST