लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर येथील मोटार अपघाताच्या वेळी आरोपी अल्पवयीन मुलासोबत मोटारीत असलेल्या त्याच्या दोन मित्रांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित मुलेही अल्पवयीन असल्याने त्यांच्या घरी जाऊन माहिती घेण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

अपघात घडला त्या वेळी मोटारीत या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलगा, त्याचे दोन मित्र आणि मोटारचालक गंगाधर पुजारी हे होते. गंगाधरने मोटार मी चालवीत नसल्याचा जबाब दिला आहे. त्याच्यावर अगरवाल यांनी दबाव टाकला. अपघाताच्या वेळी मोटारीत असलेल्या दोन मुलांच्या संपर्कात पोलीस आहेत. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. संबंधित मुले अल्पवयीन असल्याने त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलेले नाही. पोलिसांनी त्यांची घरी जाऊन चौकशी केली असल्याचे अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आणखी वाचा-राज्यातील ७४३ शेतकऱ्यांमध्ये ‘सलोखा’; मुद्रांक, नोंदणी शुल्कात ६.६० कोटींची माफी

मोटारचालकाला दोन दिवस डांबून ठेवले

सुरेंद्र अगरवाल यांनी मोटारचालक गंगाधर याला वडगाव शेरीतील बंगल्यात दोन दिवस डांबून ठेवले होते. गंगाधर घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. अगरवाल यांच्या घरी कुटुंबीय गेले. त्यांनी विचारणा करून आरडाओरडा केला तेव्हा अगरवाल यांनी गंगाधरला सोडले. त्या वेळी कुटुंबीयांनी गंगाधर यांना कंपनीचा गणवेश तेथेच ठेवण्यास सांगितले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

मोटारचालकाला पैशांचे आमिष

अपघातानंतर अगरवाल यांच्याकडे काम करणारा मोटारचालक मानसिक तणावात होता. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून आरोपी सुरेंद्र अगरवाल आणि त्यांचा मुलगा विशाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मोटारचालकाने अपघाताचा आरोप स्वत:वर घ्यावा. त्या बदल्यात चांगले बक्षीस देऊन, तुझी काही मागणी असेल, तर ती पूर्ण करू, असे आमिष अगरवाल यांनी दाखविले होते. आम्ही सांगितल्याप्रमाणे तू वागला नाही, तर तुला बघून घेऊ, अशी धमकी अगरवाल यांनी मोटारचालकाला दिली होती, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

आणखी वाचा-व्हायरल रॅप साँगमधला ‘तो’ पोर्श अपघात प्रकरणातला आरोपी नव्हता; सोशल इन्फ्लुएन्सरविरोधात गुन्हा दाखल!

अगरवाल यांच्या बंगल्यावर छापा

अगरवाल यांच्या बंगल्यावर छापा टाकून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मोटारचालक गंगाधर याला कोणत्या खोलीत डांबून ठेवले होते. गंगाधरने वापरलेला गणवेश बंगल्यात ठेवण्यात आला आहे का, तसेच गंगाधरला कोणत्या वाहनातून बंगल्यात आणले, या दृष्टीने तपास करण्यात येणार आहे.