लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शेतजमिनीचा ताबा, वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील आपसातील वाद मिटविण्यासाठी शासनाने सलोखा योजना आणली आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे, दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे दस्तांच्या अदलाबदलीसाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कात सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत ७४३ दस्त नोंद झाले असून, तब्बल ६.६० कोटी रुपयांचे मुद्रांक आणि नोंदणी शुल्कात सवलत देण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्क, शेताचा बांध, जमिनीचा ताबा, रस्ता, शेतजमीन मोजणी, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदी, शेतीवरील अतिक्रमण, शेत वहिवाट, भावा-भावांतील वाटणी, शासकीय योजेनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यता आदी कारणांमुळे शेतजमिनीचे वाद आहेत. हे वाद अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे असल्याने ते वर्षानुवर्षे चालू राहतात. या सर्व पार्श्वभूमीवर वाद संपुष्टात येण्यासाठी शासनाने सलोखा योजना सुरू केली आहे.

आणखी वाचा-व्हायरल रॅप साँगमधला ‘तो’ पोर्श अपघात प्रकरणातला आरोपी नव्हता; सोशल इन्फ्लुएन्सरविरोधात गुन्हा दाखल!

शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षांपासून असला पाहिजे, अकृषिक, रहिवासी, तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनींसाठी ही योजना लागू नाही, दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवीत आहे, अशा प्रकारची अट दस्तामध्ये असणे आवश्यक, वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी नोंदवून घेत पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दिले जात आहे, पंचनामा प्रमाणपत्र अदलाबदल दस्तास जोडणे आवश्यक अशा अटी योजनेत आहेत, अशी माहिती सह नोंदणी महानिरीक्षक नंदकुमार काटकर यांनी दिली.

विभागनिहाय आढावा

विभाग दस्त मुद्रांक आणि नोंदणी शुल्कात माफी (रुपयांत)
अमरावती१७२ १,३६,६७,१७६
लातूर १२६ १,१४,१५,६९६
नाशिक १२२ ९३,३६,८९५
ठाणे ६९ ४५,६९,०७५
पुणे ११२ १,०६,४२,९५०
संभाजीनगर ७२ १,१७,८१,६९४
नागपूर ७० ४६,२३,८०७
एकूण ७४३ ६,६०,३७,२९३