सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ‘नीट’ होणारच हे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यासाठी नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची शिकवण्या, पुस्तके, सराव चाचण्या आदींसाठी पळापळ सुरू झाली आहे. ‘नीट’चे आव्हान पार करून सध्या पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नीटच्या तयारीसाठी मोफत कार्यशाळा आणि अभ्यास वर्गाचे आयोजन केले आहे. या विद्यार्थ्यांनी नियमित मार्गदर्शन केलेली पहिली बॅचदेखील यावर्षी नीट देणार आहे. अतुल ढाकणे, अभिजित म्हात्रे, शिवकुमार थोरात, तन्वी मोदी, नागेश पिंपरे, शत्रुघ्न नागावकर, ईशा अग्रवाल, अनुजा विभुते, केतन देशमुख यांसह महाविद्यालयांतील चोवीस विद्यार्थी हा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाबाबतची माहिती अतुल ढाकणे याने ‘लोकसत्ता’ला दिली. अतुल मूळचा बीड जिल्ह्य़ातील गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक या गावचा आहे आणि तो एमबीएसच्या शेवटच्या वर्षांत शिकत आहे.

  • या उपक्रमाची कल्पना कशी सुचली?

गेल्या वर्षी समीप खंदारे या आमच्या मित्राचे हृदयविकाराने निधन झाले. त्याच्या स्मृतीसाठी, त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही करावे असे वाटत होते. त्यातून आम्ही एका ट्रस्टची स्थापना केली आणि त्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला. ज्या विद्यार्थ्यांना खासगी शिकवण्यांचे शुल्क परवडत नाही अशा विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन करण्याची सुरूवात आम्ही केली. आम्ही याच परीक्षा दिल्या असल्यामुळे काय शिकवायला हवे याची कल्पना आम्हाला होतीच. त्याचबरोबर बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही आम्ही पुनर्परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करतो.

  • या उपक्रमाला कसा प्रतिसाद आहे?

सध्या आमच्याकडे ६० विद्यार्थ्यांचा गट प्रशिक्षण घेत आहे. विविध आर्थिक, सामाजिक गटातील ही मुले आहेत. सुरूवातीला आमच्याकडे आलेल्या काही मुलांना आमच्या सराव चाचण्यांमध्ये अगदी ४५ किंवा ५० गुण मिळायचे. मात्र याच विद्यार्थ्यांची आता या चाचण्यांमध्ये २०० पैकी १८० गुण मिळवण्यापर्यंत तयारी झाली आहे. बारावीला अनुत्तीर्ण झालेले आणि पुनर्परीक्षेला बसणारे विद्यार्थीही आमच्या वर्गाना येत होते. जून अखेरपासून नव्या वर्षांची तुकडीही सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे जुलैमध्ये होणाऱ्या नीटसाठी कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येणार आहे. या कार्यशाळेला कोणतेही विद्यार्थी येऊ शकतील.

  • मोफत उपक्रम चालवणे कसे शक्य होते?

या उपक्रमासाठी मुख्य गरज होती ती जागेची. यासाठी आम्हाला पुणे महानगरपालिकेतील विरोधीपक्ष नेता अरविंद शिंदे आणि सहायक शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी मदत केली. पुणे महानगरपालिकेच्या शाळेत डिसेंबरपासून वर्ग सुरू झाले. मात्र त्यानंतर आम्हाला जागा बदलावी लागली आणि आम्ही एस. व्ही. युनियन शाळेत सध्या हे वर्ग घेत आहोत. मात्र आता जूनपासून शाळा सुरू झाली की जागेची अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे आम्ही हे वर्ग सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी येथील सोनावणे महाविद्यालयांत हलवणार आहोत. या विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था तेथे करण्यात येणार आहे. त्यासाठी लातूरचे चंद्रभान सोनावणे आम्हाला मदत करत आहेत. दीड महिन्यानंतर ही मुले पुन्हा पुण्यात येतील.

  • तुमचा अभ्यास आणि वेळापत्रक कसे सांभाळता?

आम्ही सगळेमिळून २४ जण हा उपक्रम करतो. पहिल्या वर्षांपासून ते शेवटच्या वर्षांपर्यंतचे विद्यार्थी यांत आहेत. ज्याचा जो विषय चांगला आहे, तो त्या विषयाची तयारी करून घेतो. आपापसात चर्चा करून आम्ही वेळापत्रक तयार करतो. आमच्याही परीक्षा आता आल्या आहेत. मात्र त्या वेळी आमची नियमित बॅच ही बार्शीमध्ये असेल. तेथील शिक्षकही मार्गदर्शन करत आहेत. त्याचप्रमाणे आम्ही आमची सुटी असेल त्या दिवशी बार्शीला जाऊन शिकवणार आहोत. या नियोजनानुसार रोज एक जण तेथे जाऊ शकेल. त्या वेळी बाकीचे सर्वजण पुण्यातील कार्यशाळा आणि स्वत:च्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील.

  • या उपक्रमासमोरील आव्हाने काय?

जागा हे आमच्या समोरचे मोठे आव्हान आहे. विद्यार्थ्यांना मध्यवर्ती होईल अशी जागा वर्षभरासाठी मिळणे आवश्यक आहे. हा उपक्रम पूर्णपणे मोफत आहे आणि आम्हीही सध्या शिकत आहोत. त्यामुळे व्यावसायिक दराने जागा घेणे शक्य होणार नाही.

मुलाखत: प्रदीप नणंदकर