शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रमांची पुनर्बाधणी झाली पाहिजे. मात्र शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी जास्त प्रयत्न होणे आवश्यक आहे.  शिक्षणाचा दर्जा काय, त्याचा स्तर कसा आहे, हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत, असे मत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.

शिवसेनेच्या ‘टॉप स्कोअर्स’ या उपक्रमाअंतर्गत एका कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे शुक्रवारी पुण्यात आले होते. यानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना शिक्षणाच्या दर्जाबाबत त्यांनी भाष्य केले.

‘चांगल्या समाजासाठी शिक्षण आवश्यक आहे. प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, मात्र शिक्षणाचा दर्जा, त्याचा स्तर याबाबत विचार करावा लागणार आहे. शिक्षण कोणत्या भाषेतून घ्यायचे हा प्रश्न आहे. परीक्षांचे पेपर वेळेवर मिळतात का, ते का फुटतात, याबाबतही आता विचार करावा लागेल. काही शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी असून स्वच्छतागृहे, माध्यान्य भोजन हे प्रश्न भेडसावत आहेत. त्यासाठी शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रमांची पुनर्बाधणी झाली पाहिजे. शिक्षण सर्वांपर्यंत कसे पोहोचेल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. शिक्षकांना केवळ शिकविण्याचे काम नाही; निवडणुकीचे काम, मतदार याद्यांचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात येते. त्यामुळे युवा सेनेकडून आता विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या प्रश्नावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईनुसार अभ्यास करण्यासाठीचे साधन नसते. इंटरनेटच्या सध्याच्या जगात मोफत संकेतस्थळं उपलब्ध आहेत. युवा सेनेच्या टॅब देण्याच्या योजनेचे केंद्र आणि राज्य शासनाकडून कौतुक करण्यात आले आहे. टॅबची योजनाही राज्य शासनाकडून स्वीकारण्यात येईल. टॉप स्कोअरर डॉट कॉम हे संकेतस्थळ निर्माण करण्यात आले असून मराठी आणि इंग्रजी भाषांतून आठवी आणि दहावीचा पूर्ण अभ्यासक्रम त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढच्या वर्षीपासून पहिली ते दहावी असा अभ्यासक्रम संकेतस्थळावर असेल. पाठय़पुस्तके, शब्दकोश, सराव चाचण्यांचा त्यामध्ये समावेश असेल.’

ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला

कोंढवा येथील संत गाडगेबाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. गुण प्राप्त करण्यासाठी धडपडू नका, आपण काय शिकतो हे महत्त्वाचे आहे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. कोणत्या शाळेत जाता, शाळेचे नाव काय, कोणता विषय आवडतो, शिकवणी लावली आहे का, असे प्रश्नही त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्याशी उत्स्फूर्तपणे संवाद साधला. शिवसेनेच्या उपनेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हा संपर्क प्रमुख उदय सामंत, शहर प्रमुख महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, प्रशांत बधे, महिला आघाडीच्या प्रमुख निर्मला केंडे, युवा सेना प्रमुख किरण साळी, महापालिकेतील पक्षाचे गटनेता संजय भोसले, नगरसेविका संगीता ठोसर, नगरसेवक विशाल धनवडे या वेळी उपस्थित होते.

((  शिवसेनेच्या ‘टॉप स्कोअर्स’ या उपक्रमाअंतर्गत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी कोंढवा येथील संत गाडगेबाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ))