राष्ट्रवादीच्या ‘कारभाऱ्यावरच हल्लाबोल’

ज्येष्ठ खासदार शरद पवार हे माझे दैवत आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे िपपरी-चिंचवड शहराचे नेतृत्व करणाऱ्या ‘कारभाऱ्यावर’च महिला आघाडीच्या सरचिटणीस भारती चव्हाण यांनी हल्लाबोल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीतील दलाल नेत्यांनी पक्षाची वाट लावली असून गुन्हेगार मंडळी पक्षात आणल्याने खऱ्या कार्यकर्त्यांची किंमत शून्य झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. भारती चव्हाण यांच्या आरोपामागे नेमका सूत्रधार कोण आहे, यावरून तर्कवितर्क मांडले जात आहेत.

भारती चव्हाण या राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यां आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले असून पक्षातील आतबट्टय़ाचा व्यवहार चव्हाटय़ावर आणला आहे. चव्हाण म्हणाल्या, महापालिकेत आपल्या दलालांना आणवून बसवून निष्ठावान कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली गेली. शहराचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्याने फक्त फोडा आणि तोडाचे राजकारण केली. चारित्र्य फक्त महिलांना नसते, ते पुरुषांनाही असते. हा नेता तावातावाने चारित्र्यावर बोलतो, हेच मुळी हास्यास्पद आहे. त्यांच्या खऱ्या चारित्र्यावर बोलण्यासाठी अनेक दिवसही कमी पडतील. िपपरी-चिंचवड शहरात दररोज विनयभंग व राजकीय बलात्कार होतात, त्याला जबाबदार कोण आहे, त्याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. खऱ्या कार्यकर्त्यांना मातीत घालून गुंड, चोर, खुनी, मटके आणि दारूवाले असे गुन्हेगार त्यांनी पक्षात आणले. गद्दारांना ताकद दिली, त्यामुळे निष्ठावानांची किंमत शून्य झाली. पक्षात हुकूमशाही आहे. त्यामुळे पक्ष कमकुवत झाला आहे. ज्येष्ठ सहकाऱ्यांना अपमानित करणे, अर्वाच्च भाषेत बोलणे, ज्येष्ठत्व डावलणे, दुसऱ्याला अक्कलच नाही अशा पद्धतीने वागवणे, यामुळे चांगले कार्यकर्ते पक्षाबाहेर पडले. वयस्कर महिलांनाही एकेरी संबोधणे, महिलांचे चारित्र्यहनन करणे, हे या नेतृत्वाकडून लीलया केले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.