पिंपरी काँग्रेसची जबाबदारी चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे
पक्ष म्हणून काही जण धंदा करतात, पक्षात राहून विरोधी कारवाया करतात, अशा गद्दारांची पक्षात खोगीरभरती नको, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चिंचवड येथे मांडले. राज्यभरातील अनधिकृत बांधकामे सरसकट नियमित करण्याचा प्रयत्न चुकीचा आणि दुर्भाग्यपूर्ण आहे, असेही ते म्हणाले.
पिंपरी शहर काँग्रेसच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत हंडोरे, बाळासाहेब शिवरकर, प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, शहराध्यक्ष सचिन साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, आज आपण शून्य आहोत, त्यातून उभारी घेण्याची गरज आहे आणि आपण ती नक्की घेऊच. पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसची चांगली ताकद असून हक्काचे मोठे मतदानही आहे. जुन्यांनी काँग्रेस जपली आहे. हंडोरे यांच्याकडे नव्याने जबाबदारी सोपवण्यात आली असून ते सर्वाना न्याय देतील. पिंपरीतील अनधिकृत बांधकामांच्या विषयावर ते म्हणाले, की अशी घरे बांधणारे पैसे कमवून पळून गेले आणि त्यात राहणारे रहिवासी अडचणीत आले आहेत. यासंदर्भात आघाडी सरकारने कुंटे समितीची स्थापना केली होती, त्याचा अहवाल सरकारला सादर झाल्यानंतर अनधिकृत बांधकामे सरसकट नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला; तो सर्वतोपरी चुकीचा आहे. मग, नियमाने बांधकाम करणारे चुकीचे होते का, त्यांनीही अशाच प्रकारे अनधिकृत बांधकामे करायची का, असा प्रश्न उभा राहतो. यामध्ये व्यवहार्य मार्ग काढला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात चर्चा करावी. घोटाळ्याचे आरोप असलेले अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर कारवाईचा निर्णय गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. शरद पवार म्हणाले होते, की त्यांची चूक असेल तर शिक्षा भोगावी लागेल, या वक्तव्याशी आपण सहमत असल्याचे सूचक विधान चव्हाण यांनी केले.