जेनेरिक औषधे सामान्यांच्या फायद्यासाठी आहेत, पण केवळ स्वस्त आहेत म्हणून कमी दर्जाची औषधे ‘जेनेरिक’ या नावाखाली मिळत असतील, तर ते रुग्णांसाठी घातक आहे. त्यामुळे औषधे गुणकारी आहे का हे पडताळण्यासाठी त्याला परवानगी देण्यापूर्वी त्याच्या रक्तातील पातळीची (बायोइक्विव्हॅलन्स) तपासणी सक्तीची करण्याचा अन्न व औषध प्रशासनाचा विचार आहे.
अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली. द इंडियन फार्मास्युटिकल्स असोसिएशन- पुणे (आयपीए) आणि निराली प्रकाशन यांच्या वतीने आयपीएचे पुण्यातील अध्यक्ष डॉ. आत्माराम पवार यांनी लिहिलेल्या ‘जिनेरिक औषधे : समज- गैरसमज’ या पुस्तकाचे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. माया तुळपुळे, ‘फार्मास्युटिकल कोअर ग्रुप- स्टिअर वर्ल्ड- यूएसए’चे अध्यक्ष डॉ. हिमाद्री सेन, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील, पुणे विद्यापीठाच्या फार्मसी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण चौधरी, जे. बी. मेडिकल्सचे श्रीधर जोशी या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘आता ३४८ औषधे नियंत्रित किमतींमध्ये आली असून त्यात कर्करोग व एड्ससारख्या रोगांवरील औषधांचाही समावेश आहे. केंद्र सरकारकडून जिनेरिक औषधांबाबत धोरणाची अपेक्षा आहे. जेनेरिक औषधे सामान्यांच्या फायद्यासाठी असून त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. परंतु केवळ कमी किमतीत ‘जेनेरिक’ या नावाखाली कमी दर्जाची औषधे मिळत असतील, तर ते रुग्णांसाठी घातक आहे. औषध उत्पादनास परवानगी मिळवण्यासाठी औषधांच्या ‘बायोइक्विव्हॅलन्स’ची म्हणजे रक्तातील पातळीची तपासणी राज्यस्तरावर अनिवार्य करता येईल.
औषध विक्रेत्या दुकानांना नोकरीस ठेवायला फार्मासिस्ट मिळत नाही हे चुकीचे आहे. चुकीची औषधे दिली गेल्यामुळे ७ टक्के रुग्ण आजारी पडतात अशी आकडेवारी समोर आली आहे. यात काही वेळा डॉक्टरांच्या चिठ्ठीतील नोंदही चुकीची असू शकते. परंतु ‘दुकानात फार्मासिस्ट हवाच’ ही अन्न व औषध प्रशासनाची भूमिका असून केमिस्ट असोसिएशनचेही त्याला सहकार्य आहे.’’
जेनेरिक औषधांच्या उत्पादनापूर्वी, त्यांच्या रक्तातील पातळीची मूळ औषधाच्या रक्तातील पातळीशी तुलना करणे, औषधांना केवळ त्यांच्या विरघळण्याच्या क्षमतेवर परवानगी न देणे आणि औषधांची उत्पादन मूल्ये उत्तम असणे आवश्यक असल्याचे डॉ. सेन यांनी सांगितले.
डॉ. पवार म्हणाले, ‘‘दिसायला सारखी असणारी औषधे समान गुणधर्माची असतातच असे नाही. नवीन औषध तयार झाल्यावर चार वर्षांनंतर रासायनिक गुणधर्म आणि विरघळण्याची क्षमता या दोन तपासण्यांवर आधारित त्याच औषधाचे अनेक ब्रँड तयार होता. त्यामुळे औषधाच्या चाचण्यांना महत्त्व देणे आवश्यक आहे.’’