राज्यातील भीषण दुष्काळ निवारणासाठी विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांना आपणही आपल्यापरीने साहाय्य करू या, असे आवाहन करून दुष्काळी भागासाठी धनाचा थेंब थेंब जमा करण्याचे काम कर्वेनगरामध्ये सदानंद भागवत यांच्या नेतृत्वाखाली गेले काही दिवस सुरू होते आणि या थेंबा थेंबातून दुष्काळी भागातील कामांसाठी तब्बल बारा लाख रुपयांचा निधी गोळा झाला.
ग्रामीण भागात दुष्काळग्रस्तांसाठी सुरू असलेल्या कामांना मदत करण्यासाठी शहरातून अनेक जण उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत. जनकल्याण समितीतर्फे अकरा जिल्ह्य़ांमधील १४५ गावांमध्ये दुष्काळनिवारणार्थ विविध कामे सुरू असून त्यासाठी निधीही मोठय़ा प्रमाणावर लागत आहे. या कामांवर आतापर्यंत पावणेदोन कोटी रुपये खर्च झाले आहेत. या कामात आपलाही वाटा उचलू या. या जाणिवेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्वेनगर या भागाचे संघचालक सदानंद भागवत हे पुढे आले आणि त्यांनी त्यांच्या भागातील कार्यकर्त्यांच्या मदतीने कर्वेनगरचा परिसर पिंजून काढला.
निधी देण्याचे आवाहन आम्ही ज्यांना ज्यांना केले, तसेच आपापल्या भागातून निधी जमा करून द्या, अशी विनंती ज्यांना ज्यांना केली त्या सर्वानी आपणहून पुढे येत मदत केली आणि अगदी थोडय़ा दिवसात लहान-मोठय़ा देणग्यांच्या रूपाने बारा लाख रुपये जमा झाले, असा अनुभव भागवत यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितला. या भागातील काही कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टांना तोड नाही असे सांगून भागवत यांनी त्याचीही काही उदाहरणे सांगितली.
मोहनराव आळवणी हे शैक्षणिक संस्था चालवणारे एकोणऐंशी वर्षांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या दोन्ही पायांना आधारासाठी लोखंडी पट्टय़ा लावण्यात आल्या आहेत; पण अशाही स्थितीत त्यांनी सव्वादोन लाखांचा निधी या कार्यासाठी मिळवून दिला. चिंतोपंत सबनीस यांनी त्यांच्या मुलाला पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त निधी देण्याबाबत सुचवले आणि मुलाने पन्नास हजार रुपयांचा निधी देताच सबनीस यांनीही स्वत:ची दहा हजारांची भर घालून साठ हजाराचा निधी जनकल्याण समितीला दिला. विद्यासागर पेंडसे यांनी परिचित आणि मित्रांना आवाहन करून सव्वादोन लाख रुपये या कामासाठी मिळवून दिले, तर अनिलराव इनामदार यांच्या प्रयत्नातून ज्येष्ठ नागरिक संघाकडूनही भरीव मदत या कामाला मिळाली, असे अनुभव भागवत यांनी सांगितले.
सदुसष्ट वय असलेल्या भालचंद्र खेनट यांनी ते शिकत असलेल्या सासवडच्या शाळेत त्यांच्या मॅट्रीकच्या बॅचचे एकत्रीकरण केले होते. तेथे त्यांनी समितीच्या कामांची माहिती दिली आणि त्या कार्यक्रमात लगेच तीस हजार रुपयांचा निधी गोळा झाला. दौलतराव मराठे यांचे वय अठ्ठय़ाहत्तर आहे आणि त्यांनी घरोघरी पत्रके वाटून ऐंशी हजारांचा निधी जनकल्याण समितीसाठी गोळा करून दिला. अशाच पद्धतीने सिंहगड रस्त्यावरील फडके गणपती मंदिर तसेच कर्वेनगरातील दत्त मंदिर येथेही निधीचे आवाहन करण्यात आले होते. उल्हास सावळेकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यातूनही चांगली रक्कम गोळा झाली. या निधीसाठी कोणालाही आग्रह करावा लागला नाही किंवा पाठपुरावा करावा लागला नाही. लोकांनी स्वयंस्फूर्तीने ही मदत दिली असाही अनुभव भागवत यांनी आवर्जून नोंदवला.