‘‘राजकीय पुढारी धर्माचा स्वार्थासाठी वापर करू लागले आहेत. हे नवे संकट जागतिक स्वरूपाचे आहे. त्यामुळे जनमत घडविणाऱ्यांनी राजकारणातील बारकावे लोकांना समजावून देण्यासाठी मोहीम हाती घ्यायला हवी,’’ असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी केले.
‘समता प्रतिष्ठान’ तर्फे दिला जाणारा ‘सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार’ रविवारी ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांच्या हस्ते सुराणा यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले, संस्थेचे सरचिटणीस अॅड. संपत कांबळे, कार्याध्यक्ष मधुकर निरफराके या वेळी उपस्थित होते.
सुराणा म्हणाले, ‘‘मराठवाडय़ातील ४६ टक्के गावे दुष्काळाच्या छायेत आहेत. तेथे माथा ते पायथा पाणलोट विकासाचा कार्यक्रम राबवला जाऊ शकतो. मात्र याबाबतीत केवळ सरकारलाच दोष द्यायला जीभ कचरते. कार्यकर्ते, पत्रकार आणि समाजातील जाणकार मंडळींना या गोष्टींचे महत्त्व का कळत नाही? हे चित्र उद्वेगजनक आहे. शेतकरी व शेतमजुरांना संघटित करण्यासाठी कमी संख्येने का होईना पण काही तरुण पुढे येतात हेच समाधानकारक आहे. धर्माच्या नावाने कष्टकऱ्यांचे शोषण आताही होत आहे. पुरोहित वर्गाच्या कावेबाजीविरुद्ध लोकजागरण करणे आवश्यक आहे.
समाजात आज विचारांचा व चारित्र्याचाही दुष्काळ असताना विचारांवर निष्ठा ठेवून कृतिशील राहणारे सुराणा हा विचारांचा न आटणारा झरा असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
ताकवले म्हणाले, ‘‘सामान्य माणूस आणि समाज हा पुढील काळातल्या प्रगतीचा पाया असणार आहे. तर तंत्रज्ञान सबलीकरणाचे साधन बनू शकेल. सहकारातून समाजासाठी ज्ञान निर्मिती करण्याची काळाची गरज असून त्यादृष्टीने अधिक विचारमंथन व्हायला हवे.’’
संग्रहित लेख, दिनांक 29th Apr 2013 रोजी प्रकाशित
राजकारण्यांकडून धर्माचा वापर हे जागतिक संकट- पन्नालाल सुराणा
‘‘राजकीय पुढारी धर्माचा स्वार्थासाठी वापर करू लागले आत. हे नवे संकट जागतिक स्वरूपाचे आहे. ,’’ असे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी म्हटले आहे.
First published on: 29-04-2013 at 02:04 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawalkar reward to pannalal surana