जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी येथे मोकाट श्वान आणि डुकरांचा स्थानिक नागरिक, भाविकांना त्रास होत असल्याने मोकाट श्वानांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणले जाणार आहे. पाळीव डुकरांच्या मालकांना डुकरे पकडून नेण्यास सांगितले जाणार आहे. येत्या आठ दिवसांत ही कारवाई करण्यात येणार असल्याचे जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी सांगितले.
जेजुरी तीर्थक्षेत्र असल्याने देवाचा कुळधर्म कुळाचार करण्यासाठी दररोज हजारो भाविक येथे येत असतात. येथील पुजाऱ्यांची घरे, धर्मशाळा येथे स्वयंपाक होतात, तर चिंचेची बाग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मांसाहारी स्वयंपाक केले जातात. वाया जाणारे बरेचशे शाकाहारी आणि मांसाहारी अन्न मोकाट प्राण्यांना मिळत असल्याने त्यांची संख्या वाढली आहे.
लवकरच गावातील मोकाट श्वान पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणले जाणार आहे. पाळीव डुकरांच्या मालकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून डुकरे पकडून नेण्यास सांगितले जाणार आहे. येत्या आठ दिवसांत ही कारवाई केली जाणार असल्याचे इंगोले यांनी स्पष्ट केले.