पुढील महिन्यात योजना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याचे नियोजन
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या खडकवासला धरणातून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. याबाबतची चाचणी सध्या सुरू असून मार्चपासून प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू करण्यात येणार आहे. दोन जनित्रांद्वारे ०.६ किलोव्ॉटची एकूण १.२ मेगाव्ॉट वीजनिर्मिती करण्यात येईल.
खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बील्ड, ऑपरेट, ट्रान्स्फर – बीओटी) या तत्त्वावर हे काम होणार असून सध्या त्याची चाचणी घेण्यात येत आहे. पानशेत आणि वरसगाव या दोन्ही धरणांतून खडकवासला धरणात पाणी सोडताना विद्युतनिर्मिती केली जाते. त्याप्रमाणे खडकवासला धरणातूनही वीजनिर्मिती करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार नियोजनाचे काम संपले असून सध्या चाचणी घेण्यात येत आहे.
संबंधित कंपनीला कालवा बंद करून खोदाईचे काम करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे या कामासाठी गेली काही वर्षे वाट पाहावी लागली. खडकवासला धरणातून कालव्यात शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर त्याच्या सुरुवातीलाच पॉवर हाउस बांधण्यात आले असून जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करणे शक्य झाले आहे.
वीज तयार झाल्यानंतर ते पाणी पुन्हा कालव्यात सोडले जाणार आहे. वर्षांतून कालवा १७० दिवस सुरू असतो, त्यामुळे शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर वीजनिर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली. वीज तयार झाल्यानंतर ती महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित किंवा महानिर्मितीला (महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि.) विकत देण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.
कालवा बंद करण्याची अडचण दूर
खडकवासला धरणाच्या पॉवर हाउसच्या रचनेमध्ये कालव्याच्या मुखाशी पाया खोदावा लागणार होता. त्यासाठी कालवा कोरडा असणे आवश्यक होते. महापालिका कालव्यातून पाणी घेत असल्याने तो बंद करून पॉवर हाउसचे काम करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे कंपनीने प्रकल्प उभारणीची अन्य कामे केली होती. मात्र, कालव्याच्या मुखाशी पाया खोदण्याचे काम कालव्यातील पाण्यामुळे करता येत नव्हते. महापालिकेच्या नवीन बंद जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका कालव्याऐवजी नव्या जलवाहिनीतून पाणी घेत आहे. त्यामुळे पॉवर हाउसच्या कामासाठी कालवा बंद करण्याची अडचण दूर झाली.