वाकड येथील काळाखडक झोपडपट्टीला मंगळवारी सकाळी शॉर्टसर्कीटमुळे आग लागून अठरा झोपडय़ा जळून खाक झाल्या. या आगीत भक्ष्यस्थानी आलेल्या झोपडय़ातील कुटुंबांचे संसार उघडय़ावर आले आहेत. या आगीमध्ये घरगुती साहित्य, वीस कोंबडय़ा, बकरीची दहा पिल्ले मृत्युमुखी पडले. रहाटणी, िहजवडी, पिंपरी, प्राधिकरण येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासात ही आग आटोक्यात आणली. यामध्ये अंदाजे वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वाकडजवळील काळाखडक येथे झोपडपट्टय़ा आहेत. येथील एका झोपडीमध्ये शॉर्टसर्कीटमुळे सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच शेजारच्या झोपडय़ांमध्ये ती पसरत गेली. तत्काळ अग्निशामक दलास फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. चार अग्निशामक गाडय़ा आणि टँकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास सुरुवात केली. झोपडय़ांमधील सिलेंडर बाहेर काढण्यात आले. या आगीमध्ये राजू जगताप यांच्या झोपडीतील असणाऱ्या वीस कोंबडय़ा आणि बकरीची पिल्ले भक्ष्यस्थानी पडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तास अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये अठरा झोपडय़ा पूर्णपणे खाक झाल्या, तर काही झोपडय़ांना आगीची झळ  लागली. घरातील खाण्याचे साहित्य, कपडे, टीव्ही, हे खाक झाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत.  हिंजवडी अग्निशामक केंद्राचे सहायक अग्निशामक अधिकारी आशिष मोरे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.