नारी समता मंचतर्फे दिला जाणारा ‘कन्या महाराष्ट्राची’ पुरस्कार यंदा पंढरपूर येथे एचआयव्हीबाधित व अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या मंगल शहा यांना जाहीर झाला आहे. एस. एम. जोशी सभागृह येथे रविवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावस्कर यांच्या हस्ते शहा यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
मंचच्या संस्थापक विद्या बाळ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. ‘ऐलमा पैलमा शिक्षण देवा’ या विषयावर या वेळी रेणू गावस्कर यांचे व्याख्यान होणार आहे. नारी समता मंच, अभिजित वर्दे आणि सुमंगल प्रकाशनतर्फे स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचा छपाई खर्च वगळून विक्रीतून आलेल्या रकमेतून युवा कार्यकर्तीला ‘कन्या महाराष्ट्राची’ हा पुरस्कार देण्याचे ठरविण्यात आले. मंचच्या रौप्यमहोत्सवी वर्षांपासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली असून यंदा पुरस्काराचे सातवे वर्ष आहे