‘‘मोठय़ा महत्त्वाकांक्षेने आम्ही ‘रा वन’ बनवला होता, पण तिकीट खिडकीवर तो चालला नाही. मी त्या मनस्थितीत असतानाच मला बजाजच्या चाकण येथील कारखान्याला भेट द्यायची संधी मिळाली. सुरुवातीला वाटले, मोटारसायकलच्या कारखान्यात मी काय करणार? पण मोटारसायकल प्रत्यक्ष तयार होताना पाहून हरवून जायला झालं. तो अनुभव माझ्या आयुष्यातील प्रेरणा देणाऱ्या अनुभवांपैकी एक होता..’’ किंग खान सांगत होता.
‘बजाज ऑटो’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात अभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते ‘केटीएम डय़ूक ३९०’ या मोटारसायकलच्या पुण्यातील पहिल्या पाच ग्राहकांना चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. या वेळी शाहरुख बोलत होता. तो म्हणाला, ‘‘मी खरा मोटारसायकलप्रेमी असूनही आई आणि पत्नीचा मी मोटारसायकल चालवण्यास विरोध होता. त्यामुळे ४५ वर्षे मी मोटारसायकलपासून दूर राहिलो. पण जेव्हा केटीएम डय़ूक २०० पाहिली तेव्हा ती आईलाही आवडेल असे वाटले. चेन्नई एक्सप्रेसच्या छायाचित्रीकरणाच्या वेळी मोकळ्या जागेत मनसोक्त मोटारसायकल चालवली. मोटारसायकलचे भाग सुटे करून ते पुन्हा जोडण्यास मला शिकायचे आहे.’’
मोटारसायकल चालवण्याव्यतिरिक्त आपल्याला गिर्यारोहणाची आवड असल्याचे शाहरुखने सांगितले. हॉलिवूडमधील मेरिल स्ट्रीप या अभिनेत्रीबरोबर अभिनय करण्याची इच्छा असल्याचेही तो म्हणाला.
बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज, कंपनीच्या प्रो-बायकिंग विभागाचे उपाध्यक्ष अमित नंदी या वेळी उपस्थित होते. बजाजच्या दर तीन मोटारसायकलपैकी एक निर्यात होत असून कंपनीची निर्यात जपान व ऑस्ट्रेलियामध्येही सुरू झाल्याचे राजीव बजाज यांनी सांगितले. पुढील वर्षी कंपनीतर्फे नवीन ‘फेअर्ड बाईक’ बाजारात आणण्यात याणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
शाहरुखने नाकारलेली आयआयटीची संधी
राजीव बजाज यांनी बोलताना आपण शिक्षणासाठी ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ त अर्थात आयआयटीत प्रवेश न घेण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, ‘‘मी आयआयटीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणार नाही हे मी आधीच ओळखले होते. त्यामुळे मी त्या वाटेने गेलोच नाही. शाहरुखने आयआयटीत प्रवेश घ्यावा अशी त्याच्या आईची फार इच्छा होती. त्याला प्रवेश मिळालाही होता. पण त्याने तो नाकारला.’’