पुण्यातील येरवडाच्या लुंबिनी गार्डमध्ये अर्बन-९५ अनोखा बालोत्सव संपन्न झाला. हा अशाप्रकारचा पुण्यातील तिसरा बालोत्सव आहे. या उत्सवात सुमारे ८०० मुलांनी आणि पालकांनी सहभाग घेतला. पुणे महानगरपालिकेकडून आयोजित केलेल्या या बालोत्सवात ०-६ वयोगटातील मुलं आणि त्यांते सांभाळकर्ते सहभागी होऊ शकतात. पुण्यातील विविध ठिकाणी २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या काळात हे कार्यक्रम होत आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते या बालोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी स्थानिक नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह स्थानिक पालक आणि येरवडा परिसरातील सांभाळकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात ६ वर्षांखालील मुलांची काळजी घेणाऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी खेळाच्या उपक्रमांची मनोरंजक आणि अनोखी व्यवस्था करण्यात आली. १ वर्षाच्या आतील बाळांसाठी खास ‘कॉर्नर’, १ ते ३ वर्षे व ३ ते ६ वर्षे वयोगटासाठी विकासानुरूप खेळांची मांडणी करण्यात आली. या कार्यक्रमात ३० प्रकारचे विविध उपक्रम आयोजित केले गेले. पहिल्या ५ वर्षांचे महत्त्व या विषयावर पालक+ टीमकडून ‘लिंबू टिंबू’ या गाण्याचे सादरीकरण’ करण्यात आले.

अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, “तिसरा कार्यक्रम आनंददायी शिक्षणाचे उत्कृष्ट प्रदर्शन होते. मुलांना दररोज गुंतवून ठेवण्याच्या तंत्राबद्दल या कार्यक्रमाने पालकांना उत्तरे दिली. लहान मुलांची काळजी घेणारे आणि शिक्षकांना या कार्यक्रमातून शिकण्यासारखे बरेच मनोरंजक उपक्रम आहेत. मी सर्व पालकांना आणि सांभाळकर्त्यांना सारासबाग येथील बाल महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करतो. किड्स फेस्टिव्हलसाठी पीएमसीने पिक आणि ड्रॉप सुविधेसाठी दोन बसेसची व्यवस्था केली आहे.”

या माध्यमातून पालक आणि सांभाळकर्ते मुलांसोबत आनंदाने कसे खेळायचे हे शिकत आहेत. प्री-स्कूल शिक्षिका, अंगणवाडी सेविका आणि पाळणाघर चालकांनीही हे उपक्रम नाविन्यपूर्ण आणि उपयोगी असल्याचे मत व्यक्त केलं. पुणे महानगरपालिकेने ‘बर्नार्ड व्हॅन लीर फाऊंडेशन’ आणि ‘आगा खान फाऊंडेशन’ यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित केला. एजिस इंडिया या संस्थेनेही यात तांत्रिक भागीदारी केली.
कधी आणि कुठे सहभागी व्हाल?

या बालोत्सवाचं आयोजन पुण्यातील विविध ठिकाणी २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या काळात होत आहेत. त्याचा समारोप रविवारी ५ मार्च २०२३ रोजी सारसबाग येथे होणार आहे. रविवारी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत पालक यात सहभागी होऊ शकतात. या उपक्रमांसाठी ०-६ वर्षे वयोगटातील मुले, पालक आणि त्यांचे संगोपन करणारे विनामूल्य सहभागी होऊ शकतात.