मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत आहे. आर्यन खानवरील कारवाईवरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आरोपांना सुरुवात केली तेव्हा किरण गोसावी नावाचा उल्लेख केला होता. याशिवाय आर्यन खान सोबत सेल्फी काढल्यामुळेही तो चर्चेत होता. क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली आहे. दरम्यान, किरण गोसावीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण गोसावीची पोलिस कोठडी मागताना सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी युक्तिवाद केला. त्या म्हणाल्या, “किरण गोसावी विरोधात २०१८ मधे गुन्हा नोंद आहे. तसेच एप्रिल २०१९ मधे चार्जशीट पाठवण्यात आली आहे. किरण गोसावीची सेक्रेटरी शेरबानो कुरेशी हीच्या अकाउंटमध्य चिन्मय देशमुखने तीन लाख रुपये पाठवले होते. मात्र शेरबानो कुरेशीचे हे अकांउट किरण गोसावी बनावट कागदपत्रांच्या आधारे वापरत होता. पैसै परत मागितल्यावर त्याने चिन्मय देशमुखला धमकी देत शिवीगाळ केली होती. त्यानंतर आरोपी किरण गोसावी विरुद्ध ठाणे, कळवा, अंधेरी,  पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत. यातुन गोसावीने अनेक तरुणांना फसवले असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आणखी तपासासाठी किरण गोसावीला १० दिवसांची पोलीस कोठडी मिळावी.” दरम्यान दोन्ही वकीलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गोसावीला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

किरण गोसावी बनावट कागदपत्र तयार करून मोबाईल सिम वापरत होता आणि अनेक ठिकाणी मागील काही दिवसात सचिन पाटील नावाने फिरत होता. त्यामुळे हे मोठे जॉब रॉकेट असण्याची शक्यता देखील युक्तिवाद करताना सरकारी वकीलांनी वर्तवली. 

गोसावीच्या बाजूने वकील सचिन कुंभार म्हणाले, “या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपीने पैसे घेतले नाहीत. तसेच मोबाईल कोणाच्या नावावर घेतला कोणी घेतला याची सगळी माहिती पोलिसांना आहे. तसेच अनेक मुद्दे तक्रारदार पक्षाकडून युक्तिवाद करताना मांडण्यात आले आहे. त्यातील एक ही कारण पोलीस कस्टडी मिळावी, यासाठी ग्राह्य धरता येणार नाही.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran gosavi remanded in police custody for 8 days srk 94 svk
First published on: 28-10-2021 at 17:22 IST