scorecardresearch

स्वरसम्राज्ञी कीर्ती शिलेदार यांचे निधन

गेल्या काही दिवसांपासून कीर्ती शिलेदार यांची प्रकृती ठीक नव्हती.

पुणे : आपल्या अलौकिक स्वरांच्या जादूने गेली सहा दशके संगीत रंगभूमीवर कार्यरत असलेल्या ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री, मराठी रंगभूमी संस्थेच्या प्रमुख आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या माजी अध्यक्षा कीर्ती शिलेदार (वय ६९) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. स्वरसम्राज्ञी नाटकातील भूमिकेने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. त्यांच्यामागे संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री दीप्ती भोगले या भगिनी आहेत.  गेल्या काही दिवसांपासून कीर्ती शिलेदार यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात डायलिसिसचे उपचार सुरू होते. शनिवारी पहाटे त्यांना धाप लागली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कीर्ती शिलेदार यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध मान्यवरांनी  निवासस्थानी जाऊन शिलेदार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीत रंगभूमीवरील जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार या दांपत्याच्या दोन्ही कन्या दीप्ती आणि कीर्ती शिलेदार यांनी संगीत रंगभूमी हेच आपले कार्यक्षेत्र मानले. घरातच संगीत रंगभूमीचे बाळकडू मिळालेल्या कीर्ती यांनी संगीत रंगभूमीची ध्वजा फडकावत ठेवली. विविध २७ नाटकांतून ३४ भूमिका साकारत कीर्ती शिलेदार यांनी साडेचार हजारांहून अधिक प्रयोग केले. कीर्ती शिलेदार यांना डोळ्यासमोर ठेवूनच विद्याधर गोखले यांनी स्वरसम्राज्ञी नाटकाची निर्मिती केली होती. नाटकातील ‘मैना’ भूमिकेला कीर्ती शिलेदार यांनी न्याय दिला.

संगीत रंगभूमीच्या शिलेदार

संगीत रंगभूमी हेच आपले जीवितकार्य समजून कीर्ती शिलेदार यांनी संगीत रंगभूमीची ध्वजा फडकवत ठेवण्याचे काम अखेरच्या श्वासापर्यंत केले. वडील जयराम शिलेदार आणि आई जयमाला रंगभूमीवरील गायक-कलाकार असल्यामुळे कीर्ती शिलेदार यांच्यावर लहानपणीच संगीत आणि अभिनयाचे संस्कार झाले. १६ ऑगस्ट १९५२ रोजी जन्म झालेल्या कीर्ती यांचे वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘सौभद्र’ या तीन पात्रांच्या नाटकाद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. या नाटकातील त्यांच्या नारदाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मराठी विषय घेऊन त्यांनी पदवी संपादन केली.

विद्याधर गोखले यांचे ‘स्वरसम्राज्ञी’ हे नाटक खास कीर्ती शिलेदार यांच्यासाठीच होते. या नाटकाच्या निमित्ताने कीर्ती यांना पं. निळकंठबुवा अभ्यंकर गुरू म्हणून लाभले. अभ्यंकरबुवांच्या तालमीत कीर्ती यांनी शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, ठुमरी अशा विविध संगीत प्रकारांची मेहनत घेतली. तमाशामध्ये काम करणाऱ्या मैनेपासून शास्त्रीय संगीत गाणाऱ्या घरंदाज गायिकेपर्यंतच्या छटा कीर्ती शिलेदार यांनी आपल्या भूमिकेतून ताकदीने सादर केल्या. देशात आणि परदेशात संगीत नाटकांचे प्रयोग, नाट्यपदांच्या मैफिली, सप्रयोग व्याख्याने त्यांनी दिली होती. पारंपरिक संगीत नाटकांप्रमाणेच ‘स्वरसम्राज्ञी’, ‘अभोगी’, ‘मंदोदरी’ ही वेगळ्या धाटणीची नाटके त्यांनी आपल्या स्वराभिनयाने गाजवली होती. आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेत दोनदा त्यांचे गायन प्रसारित झाले होते.जुन्या संगीत नाटकांतून त्यांनी अनेक भूमिकांमधून संगीत रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. तबला आणि पखवाजवादनावर त्यांचे प्रभुत्व होते.  दीप्ती भोगले यांच्या ‘संगीत नादलुब्ध मी’ आणि ‘संगीत चंद्रमाधवी’ या दोन्ही नाटकांचे संगीत दिग्दर्शनही कीर्ती शिलेदार यांनी केले. ‘स्वर-ताल-शब्दसंगती’ हा संगीतातील शब्दार्थाचे आणि काव्यार्थाचे महत्त्व सांगणारा शोधनिबंध त्यांनी लिहिला होता. ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालया’तर्फे (एनएसडी) विविध भाषक विद्यार्थ्यांकडून त्यांनी हिंदी भाषेतून नाट्यगीते गाऊन घेतली होती. ‘एनएसडी’तर्फे झालेल्या ‘एकच प्याला’च्या प्रकल्पामध्येही त्यांचा सहभाग होता. ‘संगीत शारदा’ या नाटकाचा हिंदी नाट्यांशही त्यांनी सादर केला. संगीत नाटक अकादमीच्या समितीवरही त्यांनी पाच वर्षे काम केले होते.

संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात मराठी रंगभूमी संस्थेच्या माध्यमातून संगीत रंगभूमीची जोपासना करण्याचे काम कीर्ती शिलेदार यांनी केले. जुन्या आणि नव्या संगीत नाटकात भूमिका साकारून त्यांनी त्या भूमिकांवर आपल्या अभिनय आणि गायनाची नाममुद्रा उमटवली. – निर्मला गोगटे, ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री

संगीत रंगभूमीवरील मागची पिढी आणि युवा कलाकार अशा दोन्ही पिढ्यांना जोडणारा दुवा म्हणून कीर्ती शिलेदार यांनी काम केले. घरातूनच मिळालेला वारसा त्यांनी आपल्या कारकिर्दीत मोठे काम करून उज्ज्वल केला. निळकंठबुवा अभ्यंकर यांच्यासारख्या गुरूमुळे त्यांचे गायन बहरले. कीर्तीताई यांच्यासमवेत एका नाटकात काम करण्याची संधी कधीच लाभली नाही.  – मधुवंती दांडेकर, ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री

कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने संगीत रंगभूमीच्या गाभाऱ्यातील नंदादीपाची ज्योत मावळली. संगीत रंगभूमी जगविण्याची आणि जागविण्याची त्यांची तळमळ, आर्तता, प्रयत्न आणि उपासना यातून रंगभूमीला एक चैतन्य आणि ऊर्जा मिळत गेली.  – डॉ. रामचंद्र देखणे, अध्यक्ष, गांधर्व महाविद्यालय

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kirti shiledar passes away akp

ताज्या बातम्या