दररोज दहा ते बारा हजार किलो लिचीची आवक

लालचुटूक लिची पाहताच अनेकांना लिचीचा आस्वाद घेण्याचा मोह पडतोच. अशा रसदार आणि लालचुटूक लिचीची आवक कोलकात्याहून गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ बाजारात सुरू झाली आहे. घाऊक फळ बाजारात सध्या दररोज दहा ते बारा हजार किलो एवढी लिचीची आवक होत आहे.

बाजारात दाखल झालेल्या लिचीची चव आंबट-गोड अशी आहे. गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात कोलकात्याहून सध्या दररोज दहा ते बारा हजार किलो लिचीची आवक सुरू असून प्रत्येक खोक्यात नऊ किलो लिची भरलेली असते. प्रतवारीनुसार लिचीच्या नऊ किलोच्या खोक्याला आठशे ते चौदाशे रुपये असा भाव मिळत आहे. साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात लिचीची आवक सुरू होते. लिचीचे उत्पादन प. बंगालमध्ये मोठय़ा प्रमाणावर होते. कोलकाता आणि बिहारमधील मुझ्झफरनगर भागातील लिची उत्पादक शेतकरी व विक्रेत्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात लिची विक्रीसाठी पाठवली जाते. येत्या काही दिवसांत लिचीची आवक आणखी वाढेल. लिचीचा हंगाम बहरात आल्यानंतर फळ बाजारात दररोज पंधरा ते वीस हजार किलो लिचीची आवक होईल, अशी माहिती फळ बाजारातील विक्रेते राजेश परदेशी यांनी दिली.

लिचीचा हंगाम जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. सध्या येत असलेली लिची आंबट-गोड असली तरी आवक वाढल्यानंतर गोड लिचीचे प्रमाण वाढेल. सध्या होत असलेली लिचीची आवक ही कोलकाता तसेच पश्चिम बंगालमधील विविध भागांतून होत आहे. बिहारमधील मुझफ्फरनगर भागातून लिचीची आवक होत असून किरकोळ ग्राहक तसेच फळ विक्रेत्यांकडून लिचीला चांगली मागणी आहे. लिचीचा हंगाम २० जूनपर्यंत सुरू राहील, असेही परदेशी यांनी सांगितले.

लिचीचा मार्केट यार्ड बाजारातील भाव

  • नऊ किलोचा ८०० ते १२०० बॉक्स (मध्यम प्रत)
  • नऊ किलोचा १३०० ते १४०० बॉक्स (मध्यम प्रत)