शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात छेडछेडाची घटना रोखण्यासाठी गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या महिला पोलिसांची (बीटमार्शल) संख्या दुपटीने वाढविण्यात येणार आहे, अशी घोषणा पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी मंगळवारी केली.
जागतिक महिला दिनानिमित्त पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त के. के. पाठक, अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, अरविंद चावरिया, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी याप्रसंगी उपस्थित होते. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण, प्रतिभा जोशी, रेहाना शेख यांनी पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिलांनी त्यांना सोपविलेल्या कामाला न्याय दिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त के. के. पाठक म्हणाले, गेल्या सहा महिन्यात महिला पोलिसांनी गस्त घालताना  ५७ गुन्हे उघडकीस आणले. त्यापैकी वीस गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे होते. सध्या शहरात चाळीस महिला पोलीस गस्त घालतात. त्यांना १६ दुचाकी देण्यात आल्या आहेत. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांना सुरक्षितता देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा निश्चित फायदा झाला आहे. गस्त घालणाऱ्या महिला पोलिसांशी महिला संवाद साधतात तसेच त्यांच्या तक्रारी नोंदवितात. त्यामुळे गुन्हेगार, सडक सख्याहारींना आळा बसला आहे.
महिनाअखेरीपर्यंत शहरात गस्त घालणाऱ्या महिलांची संख्या दुपटीने वाढविण्यात येणार आहे. महिला पोलिसांचा वावर वाढल्यास छेडछेडीच्या घटनांना आळा बसेल, असे पोलीस आयुक्त पाठक यांनी सांगितले.
महिलांसाठी प्रतिसाद अ‍ॅप
आपत्कालीन परिस्थितीत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून प्रतिसाद हे उपयोजन (अ‍ॅप ) सुरू  करण्यात आले आहे. मोबाईल संचावर हे अ‍ॅप डाऊनलोड करताना ईमेल आयडी, नातेवाईकांची माहिती आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. अडचणीच्या काळात या अ‍ॅपमधील विशिष्ट बटन दाबताच तातडीने पोलीस तेथे दाखल होतील, अशी माहिती पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली.