अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून जाण्याच्या घटनेला आठ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापही ललित पाटील याचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. रुग्णालयातून रुग्ण पळून गेल्याने पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु, संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. तसंच, ललित पाटील हा गेल्या नऊ महिन्यांपासून ससून रुग्णालयात दाखल होता. त्यामुळे त्याला नेमका कोणता आजार झाला होता याविषयी डॉक्टरांनी माहिती दिली आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी टीव्ही ९ शी संवाद साधला.

हेही वाचा >> ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्याकरता मंत्र्याचा फोन; सुषमा अंधारेंच्या आरोपांवर दादा भुसेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

ललित पाटील गेल्या नऊ महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत होता. त्यामुळे त्याला नेमका कोणता आजार झाला होता? असा प्रश्न ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय ठाकूर यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “ललित पाटीलच्या आरोग्याप्रश्नी हायकोर्टाकडूनही पत्र आलं होतं. त्यानुसार, तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याची तपासणी करून हायकोर्टाला उत्तर सादर केलं आहे. ललित पाटीलला चार ते पाच प्रकारचे आजार झाले होते. त्याच्यावर चार डॉक्टर उपचार करत होते.”

“त्याला कोणता आजार होता याविषयी मी सांगू शकत नाही. पण त्याला चार ते पाच प्रकारचे आजार होते. एकट्या रुग्णाला तीन ते चार डॉक्टर तपासत असतात. त्यानुसार, ललित पाटीलवरही चार ते पाच डॉक्टर उपचार करत होते. त्याच्या योग्य तपासण्या सुरू होत्या. तपासण्या करून ज्या आजारांचं निदान झालं, त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू होते”, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

हेही वाचा >> ‘ससून’च्या अधिष्ठात्यांना आमदार धंगेकर धारेवर धरतात तेव्हा…

“डॉक्टर हे त्या विषयातील तज्ज्ञ असतात. डॉक्टर रुग्णाला तपासत असतात तेव्हा तो आरोपी आहे की सामान्य माणूस आहे हे न पाहता उपचार करत असतात”, असंही ते म्हणाले. “ललित पाटील पळून गेल्याचं कळताच आम्ही याप्रकरणी आयुक्तांना कळवलं होतं. आरोग्य कर्मचाऱ्याचा केवळ उपचार करण्याशी संबंध असतो, त्यामुळे यावर अधिक भाष्य करणार नाही”, असंही पुढे त्यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेफेड्रोन तयार करण्यात पाटील वाकबगार

ससून रुग्णालयात उपचार घेणारा कैदी ललित पाटील याला चाकण परिसरात २०२० मध्ये अंमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून १६ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. पाटील स्वत: मेफेड्रोन तयार करत असल्याची माहिती पोेलिसांनी न्यायालयात दिली. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. मात्र त्यानंतर, २ ऑक्टोबर रोजी तो रुग्णालयातून फरार झाला आहे. आठ दिवस झाले तरी पोलीस त्याला पकडू शकलेले नाहीत.