पुणे : लेसिक या चष्म्याच्या नंबर घालविण्याच्या शस्त्रक्रियेकडे पूर्वी सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पाहिले जायचे. चष्मा असल्यामुळे विवाह ठरण्यास अडचणी येत असल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात विवाहोत्सुक तरुणांचे प्रमाण सर्वाधिक होते. आता कामगिरीच्या दृष्टिकोनातून या शस्त्रक्रियेला महत्त्व मिळू लागले आहे. खेळाडू, संरक्षण दलांसह इतर दलांमध्ये भरती होण्यास इच्छुक असलेले उमेदवार लेसिक शस्त्रक्रियेचा पर्याय मोठ्या प्रमाणात निवडू लागले आहेत.

मैदानी खेळातील खेळाडूंना प्रामुख्याने चष्म्यामुळे समस्या निर्माण होतात. चष्मा असल्यामुळे त्यांना व्यवस्थितपणे खेळ खेळता येत नाही. गेल्या काही वर्षांत खेळाडूंकडून लेसिक शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमधील लेसिकतज्ज्ञ डॉ. मुकेश परयानी म्हणाले की, लेसिक शस्त्रक्रियेमुळे चष्म्याच्या नंबर घालवता येत असल्याने खेळांडूना चष्म्याशिवाय खेळता येते. यामुळे त्यांच्या कामगिरीत सुधारणा होते. जलतरणासह अनेक खेळ हे चष्मा घालून शक्य होत नाहीत. अशा खेळाडूंसाठी लेसिक शस्त्रक्रिया अतिशय महत्त्वाची ठरत आहे. आता लेसिकपेक्षा आधुनिक स्माईल प्रो ही प्रक्रियाही आम्ही सुरू केली आहे. ही प्रक्रिया अतिशय कमी वेळेत होते आणि त्यामुळे रुग्ण बरा होण्याची कालावधीही कमी होतो.

सौंदर्यापेक्षा नोकरीची गरज म्हणून लेसिक शस्त्रक्रिया करून घेण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत लेसिकतज्ज्ञ डॉ. प्रणव पाटील म्हणाले की, लेसिक, स्माईल या सुरुवातीला सौंदर्यात्मक प्रक्रिया मानल्या जात होत्या. आज रुग्ण विविध दैनंदिन कारणांसाठी आणि प्रामुख्याने चष्म्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करून घेत आहेत. संरक्षण दले, पोलीस, व्यापारी नौदल किंवा व्यावसायिक वैमानिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे तरुण आणि तरुणी या व्यवसायांच्या दृष्टीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी ही शस्त्रक्रिया करतात. त्यामुळे लेसिक शस्त्रक्रिया आता एक सौंदर्यासाठी केली जाणारी प्रक्रिया न मानता आवश्यक प्रक्रिया म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. दृष्टी स्वातंत्र्य मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या जीवनाची गुणवत्ता या शस्त्रक्रियेमुळे लक्षणीयरीत्या वाढते.

लेसिक शस्त्रक्रियेचे फायदे

चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्सपासून मुक्तता

अतिशय कमी वेळेत प्रक्रिया

रुग्ण बरा होण्याचा कालावधीही कमी

दीर्घकाळ दृष्टीतील सुधारणा कायम

दैनंदिन जीवनातील अडचणी कमी

दृष्टी सुधारण्याचा सुरक्षित पर्याय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया सुलभ