मिथेन घेऊन हैदराबादकडे निघालेल्या टँकरला नाशिक फाटा येथे कंटेनरची धडक लागून टँकरमधील वायूची गळती सुरू झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोचून टँकर निर्जनस्थळी नेऊन वायू हवेत सोडला. सकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. मिथेन हे ज्वलनशील रसायन असून त्यामुळे श्वसनालाही त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच उपाययोजना केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या वायुगळतीमुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
कृष्णा लॉजेस्टिक ट्रान्सपोर्टचा टँकर मुंबईहून मिथेनॉल घेऊन हैदराबादकडे निघाला होता. नाशिक फाटय़ाजवळ या टँकरला एका कंटेनरने धडक दिली. त्यामुळे टँकरच्या केबीनचा पुढील भाग दबून त्याचा भार मागील बाजूवर पडला. त्यामुळे टँकरमधून मिथेनची गळती सुरू झाली. या टँकरमध्ये २० हजार लिटर मिथेन होता. घटनेची माहिती मिळताच एकच्या सुमारास अग्निशामक दलाच्या दोन गाडय़ा घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी सुरूवातीला वायुगळती थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, ते शक्य नसल्याचे दिसून आल्याने टँकर सीआयआरटीच्या मोकळ्या मैदानात नेला. तेथे गेल्यानंतर टँकरची अधिक माहिती घेतली असता मिथेन हा चार कप्प्यामध्ये असल्याचे आढळून आले. एका कप्प्यातून गळती होत असल्यामुळे सकाळी सहा वाजेपर्यंत वायू हवेत सोडून दिला. मिथेन हा ज्वलनशील व श्वसनालाही त्रासदायक आहे. वेळीच उपाययोजना केल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी दिली.