आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत, कलासंपादक, सांस्कृतिक पत्रकारितेचे अध्यापक सदानंद मेनन यांचे शनिवारी (६ जुलै) प्रा. राम बापट स्मृती व्याख्यानमालेत व्याख्यान होणार आहे. ‘अस्मितांची संकल्पना / कल्पना- द्रविडी राष्ट्रवादाचे सांस्कृतिक राजकारण’ हा त्यांच्या व्याख्यानचा विषय आहे.
एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बापट यांचे मित्र आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. गो. पु. देशपांडे भूषविणार आहेत. मकरंद साठे आणि गजानन परांजपे या रंगकर्मीना प्रा. राम बापट सरांचा दीर्घकाळ सहवास लाभला. त्यांच्याशी झालेल्या संवादातून समृद्ध होण्याचे भाग्य लाभले. बापटसरांविषयी वाटणाऱ्या कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांनी या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. एका बाजूला साहित्य, अभिनय आणि कलाव्यवहार, दुसऱ्या बाजूला वैचारिक व्यवहार तर, तिसऱ्या बाजूला जनसामान्य यामधील दरी दिवसेंदिवस वाढताना दिसते. या तीन सामाजिक व्यवहारांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध असणे समाजहितासाठी आवश्यक बाब आहे. ही दरी कमी करण्याचा एक हाती प्रयत्न प्रा. राम बापट यांनी आयुष्यभर कसोशीने केला. त्यांचे हे कार्य लहान प्रमाणात का होईना सुरू ठेवणे हेच या व्याख्यानमालेचे उद्दिष्ट आहे.