पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी ‘अंकुश’ नावाचे पुस्तक काढले. त्यात, राष्ट्रवादीच्या कारभाराचे चांगलेच वाभाढे काढण्यात आले होते. त्यापाठोपाठ, मावळ लोकसभेचे दावेदार व गटनेते श्रीरंग बारणे यांचे ‘शब्दवेध’ नावाचे पुस्तक शनिवारी प्रकाशित होत आहे. त्यामध्ये बारणे यांनी सत्ताधाऱ्यांच्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश केला आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे शक्तिप्रदर्शनाचे नियोजन आहे.
थेरगावात पदमजी पेपर मिलजवळ सायंकाळी साडेपाच वाजता माजी मंत्री लीलाधर डाके यांच्या हस्ते ‘शब्दवेध’ पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे असून संपर्कप्रमुख गजानन कीर्तीकर, डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार शिवाजीराव आढळराव, गजानन बाबर आदी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी शक्तिप्रदर्शनाचे नियोजन केले आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे व काँग्रेस नेते हनुमंत भोसले यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. नगरसेवक नीलेश बारणे यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली.