दुर्मिळ प्रकाशचित्रे आणि धातुमुद्रांचे नावीन्यपूर्ण प्रदर्शन.. विविध कलाकार आणि विषयांशी संबंधित लघुपटांचा ‘षड्ज’ महोत्सव.. कलाकारांचा जीवनप्रवास उलगडणारे ‘अंतरंग’.. ही ६१ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची वैशिष्टय़े आहेत. पं. कुमार गंधर्व यांचे शिष्य पं. सत्यशील देशपांडे यांना यंदाचा वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर झाला आहे. ३५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवास जोशी आणि इंडियन मॅजिक आयचे संचालक ऋषीकेश देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक आहे. सवाई गंधर्व स्मारक येथे गुरुवारपासून (१२ डिसेंबर) तीन दिवस सकाळी साडेदहा वाजता ‘षड्ज’ आणि साडेअकरा वाजता ‘अंतरंग’ हे उपक्रम होणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांसाठी कोणतेही प्रवेशमूल्य नसून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.
ज्येष्ठ सतारवादक पं. रविशंकर आणि ज्येष्ठ गायक पं. एम. एस. गोपालकृष्णन या दिवंगत महान कलावंतांना आदरांजली म्हणून प्रसिद्ध छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनी टिपलेली त्यांची काही दुर्मिळ प्रकाशचित्रे यंदाच्या प्रदर्शनात पाहण्यास मिळतील. त्याचबरोबर स्टेनलेस स्टीलच्या प्लेटवर लेझर तंत्रज्ञानाने कटिंग करून बनविलेल्या कलावंतांच्या भावमुद्रा हे यंदाच्या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असेल. उस्ताद अब्दुल करीम खाँ, पं. सवाई गंधर्व, पं. भीमसेन जोशी, उस्ताद विलायत खाँ, पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद राशिद खाँ यांसह ३० कलाकारांच्या या धातुमुद्रा रसिकांना पाहता येतील. याची संकल्पना आणि आरेखन ‘अनुनाद क्रिएटिव्ह रेझोनन्स’ या  संस्थेची आहे.
‘अंतरंग’मध्ये गुरुवारी (१२ डिसेंबर) सतारवादक उस्ताद निशात खाँ यांची मुलाखत मंगेश वाघमारे घेणार आहेत. शुक्रवारी (१३ डिसेंबर) पं. सत्यशील देशपांडे यांच्याशी श्रीनिवास जोशी संवाद साधणार असून शनिवारी (१४ डिसेंबर) ‘श्रुतींची संख्या किती’ या विषयावर ज्येष्ठ संवादिनीवादक डॉ. अरिवद थत्ते यांचे व्याख्यान होणार आहे. ‘षड्ज’मध्ये गुरुवारी (१२ डिसेंबर) पं. जसराज, शुक्रवारी (१३ डिसेंबर) कथक, बेगम अख्तर, स्वरगंगा गंगुबाई हनगल तर, शनिवारी (१३ डिसेंबर) गिरीजा देवी आणि श्रुती अँड ग्रेस इन इंडियन म्युझिक हे लघुपट दाखविले जाणार आहेत.
—चौकट—
महोत्सवात सहभागी रसिकांना घरी परतण्यासाठी ‘पीएमपीएमएल’ने १२ ते १५ डिसेंबर या कालावधीत खास बसेसची व्यवस्था केली आहे. रमणबाग प्रशाला येथून कात्रज, आनंदनगरमार्गे सिंहगड रस्ता, धायरी, कोथरूड डेपो आणि कर्वेनगर येथे दररोज बसेस सोडण्यात येणार असून त्यासाठी २५ टक्के जादा दर आकारला जाईल.
महोत्सवाचे प्रायोजक असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) महोत्सवात सहभागी होणाऱ्या रसिकांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. एमटीडीसीच्या पानशेत येथील रिसोर्टला ३१ एप्रिलपूर्वी भेट देणाऱ्या रसिकांना ३० टक्के तर, कार्ला येथील वॉटर पार्कला ३१ डिसेंबरपूर्वी भेट देणाऱ्यांना ४० टक्के सवलत जाहीर केली असल्याची माहिती एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुरव यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life journey of artists will shown in antarang
First published on: 10-12-2013 at 02:41 IST