‘बलम पिचकारी,’ ‘लत लग गई’ अशा तुफान लोकप्रिय झालेल्या गाण्यांच्या जोरावर बॉलीवूडमधील खणखणीत नाणं बनलेली लोकप्रिय गायिका शाल्मली खोलगडे हिची लाईव्ह कन्सर्ट ऐकण्याची संधी शनिवारी (१४ मार्च) पुणेकरांना मिळणार आहे. ‘९३.५ रेड एफएम’ ने आयोजित केलेल्या ‘रेड लाईव्ह-बलम पिचकारी’ या कार्यक्रमात शाल्मली गाणार आहे. ही कन्सर्ट एनआयबीएम रस्त्यावरील कोरिएंथम रिसॉर्ट व क्बल येथे होणार आहे. हा कार्यक्रम दोन आठवडय़ांपूर्वी होणार होता. मात्र, काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला.
‘दै. लोकसत्ता’ या कन्सर्टचा माध्यम प्रायोजक आहे. ‘रेड लाईव्ह’ हा ९३.५ रेड एफएम या रेडिओ चॅनेलचा अत्यंत गाजलेला उपक्रम आहे. त्याद्वारे अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या लाईव्ह कन्सर्ट आयोजित केल्या जातात. गेल्या दोन वर्षांत अशा वीसपेक्षा अधिक कन्सर्ट झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी शाल्मली पुणेकरांसमोर आपली गाजलेली गाणी सादर करणार आहे. याबाबत ‘रेड एफएम’च्या सीओओ निशा नारायणन म्हणाल्या, की विविध घडामोडींसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश होतो. येथील तरुणाई संगीतप्रेमी आहे. त्यामुळे येथे शाल्मलीची लाईव्ह कन्सर्ट आयोजित करण्यात आली आहे. त्याद्वारे आम्ही येथील तरुण संगीतप्रेमींना शाल्मलीला प्रत्यक्ष पाहण्याची आणि ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
या कन्सर्टचे पासेस मिळविण्यासाठी ९३.५ रेड एफएम रेडिओ चॅनेल ऐकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.