कर्वेनगरमधील ताथवडे उद्यानानजीक एकाला धमकावून चार लाख ६८ हजारांची रोकड लुटण्याचे प्रकरण बनाव असल्याचे तपासात उघड झाले आहे. मद्यविक्रेत्याकडे कामाला असलेल्या व्यवस्थापकाने पोलिसांकडे खोटी फिर्याद देऊन दिशाभूल केली. व्यवस्थापकाने सुरू केलेल्या हॉटेल व्यवसायात तोटा झाल्याने तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याने रोकड लुटल्याची तक्रार दिल्याचे उघडकीस आले असून अलंकार पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना खोटी फिर्याद देऊन दिशाभूल केल्याप्रक रणी राकेश परदेशी (वय ३५, रा. बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. परदेशी कर्वेनगर भागातील एका मद्यविक्रेत्याकडे व्यवस्थापक आहे. मद्याविक्रीच्या दुकानाची जबाबदारी त्याच्याकडे सोपविण्यात आली होती. दुकानात जमा झालेली रोकड भरण्यासाठी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मी बँकेत निघालो होते. कर्वेनगर भागात शहीद मेजर ताथवडे उद्यानानजीक मला दुचाकीस्वार चोरटा आणि त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराने अडवले. दुचाकीचा टायर पंक्चर झाला आहे, अशी बतावणी त्यांनी केली. डोळ्यात मिरची पूड टाकून रोकड असलेली पिशवी हिसकावून चोरटे पसार झाले, अशी तक्रार परदेशीने सोमवारी सायंकाळी पोलिसांकडे दिली होती.

गुन्हा घडल्यानंतर तीन ते चार तासांनी परदेशी अलंकार पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळी परदेशीला नेण्यात आले. चोरटे कुठून आले, कसे पसार झाले?, याबाबत पोलिसांकडून विचारणा करण्यात आली. तेव्हा परदेशीने पोलिसांना दिलेल्या उत्तरात विसंगती आढळली. चोरटय़ांनी मिरची पूड फेकून रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली, असे परदेशीने तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे पोलिसांकडून रस्त्याची पाहणी करण्यात आली. तेव्हा रस्त्यावर मिरची पूड आढळली नाही. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेल्या चित्रीकरणाची पाहणी करण्यात आली. तेव्हा परदेशी दिशाभूल करत असल्याचे उघडकीस आले. पोलिसी खाक्या दाखविताच परदेशीने रोकड लुटल्याचा बनाव रचल्याची कबुली दिली.

परदेशीने एक हॉटेल सुरू केले होते. महामार्गावर दारू विक्री करण्यास मनाई करण्यात आल्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर  हॉटेल व्यवसायात तोटा झाला होता. त्यामुळे परदेशी कर्जबाजारी झाला. त्यामुळे त्याने रोकड लुटीचा बनाव रचला, अशी माहिती तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली. पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक आयुक्त किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयकुमार शिंदे, सहायक निरीक्षक संदीप बुवा, नितीन कांबळे, उस्मान कल्याणी, राजेंद्र लांडगे, श्रीकांत चव्हाण, योगेश बडगे यांनी ही कारवाई केली.

डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्याची थाप

डोळ्यात मिरची पूड टाकल्यानंतर डॉक्टरांकडे गेलो. तेव्हा त्यांनी इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या, अशी थाप रोहित परदेशीने मारली. पोलिसांकडून नेत्रतज्ज्ञांचे मत घेण्यात आले. तेव्हा मिरची पूड टाकल्यास डोळ्याच्या अंतर्गत भागाला इजा पोहोचते. अशा वेळी डोळ्यात सोडण्यासाठी औषधे दिली जातात, असे सांगण्यात आले. तेव्हा परदेशी दिशाभूल करत असल्याचे उघडकीस आले.