मे महिन्याचा मध्य आहे आणि वातावरण पावसाळी असले, तरी मुलांसाठी अजूनही उन्हाळ्याच्या सुटीचा सुखाचा काळ सुरू आहे ! दहावीसाठीचे काही शिकवणीवर्ग वगैरे सुरू असतीलही, पण एकूण मुलांसाठी अभ्यासासाठीच्या नव्या कोऱ्या वह्या आणि पाठ्यपुस्तकांचा नवा कोरा गंध श्वासांत भरून घेण्यासाठी अजून वेळ आहे ! अर्थात, आता अलीकडे या गंधाचे किती अप्रूप राहिले आहे, हा भाग अलाहिदा. पण, काहींसाठी ते शिल्लक आहे, असे समजू. या गंधासारखा सुटीकाळही पूर्वीसारखा, आठवणखुणा जपणारा राहिलेला नाही. क्रिकेट खेळण्यासाठी उडणारी झुंबड वगळता दुपारी रंगणारे पत्त्यांचे डाव, पेरूच्या झाडांवर चढून पेरू काढण्यातली मजा, पहाटे किंवा सायंकाळी केल्या जाणाऱ्या टेकड्यांवरल्या भटकंत्या, सायकली दामटत पालथे घातले जाणारे शहरातले रोज वेगवेगळे भाग, पर्वती, सारसबाग, शनिवारवाड्याच्या भेटी, त्यानंतर भेळ खाण्याचा ‘कार्यक्रम’, घराच्या गच्चीवर झोपण्याचे शिरस्ते आणि रात्री आकाशनिरीक्षण करताना पाठ झालेली ताऱ्यांची बेटे हे सगळे शहरातील लहानग्यांच्या सुटीच्या अनुभवविश्वात आताशा शिल्लक आहे का, असाच अनेकदा प्रश्न पडतो.
असा प्रश्न पडण्याचे कारण अर्थातच मुलांचे आयुष्य पूर्णपणे व्यापून टाकलेले विविध पडदे हेच. स्मार्टफोन, लॅपटॉपचे बालपणातच त्यांच्या आयुष्यात येणे एकीकडे मुलांना तंत्रस्नेही बनवणारे खरेच, पण हा स्नेह इतका अति आहे, की त्याने सुपरिणामांपेक्षा दुष्परिणामच अधिक आणले आहेत. म्हणजे, सततच्या स्क्रीनटाइमचा डोळ्यांना होणारा त्रास, झोपेची लागलेली वाट, एकाग्रतेवर झालेला परिणाम, आभासी विश्वाच्या आकर्षणाने लहान वयातच भेडसावू लागलेले मानसिक आजार, याबरोबरच आता शरीरावरदेखील अनेक दुष्परिणाम होत असल्याचे दिसू लागले आहे. स्क्रीनटाइम आणि जंकफूड हे मिश्रण लहान वयात कोलेस्ट्रॉल वाढवून किशोरवयीन अवस्थेतच अनेकांना रक्तदाबाच्या त्रासाकडे घेऊन चालल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
आता हे काही माहीत नाही, लपून राहिले आहे किंवा पालकांना कळत नाही, असेही नाही. पण, यातून अनेकदा बाहेर कसे पडायचे, याचे उपाय अवगत होत नाहीत. शहरातील अनेक कुटुंबांत त्यामुळे सुटी हाही एक मानसिक ताण असतो. सध्याही तो जाणवतो आहे. अनेकजण मग मुलांना पडद्यापासून दूर ठेवण्यासाठी, त्यांना ‘गुंतवून’ ठेवण्याची सुटीची वेळापत्रके तयार करतात. नाना प्रकारचे वर्ग, नानाविध शिबिरे, ट्रेकिंग अशा एक ना अनेक ठिकाणी, प्रसंगी भरमसाट शुल्क भरून मुलांना ‘गुंतवून’ ठेवण्याचे पालकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतात. मुलांचा सर्वांगीण विकास करायचा, तर सुटीत हे करायला नको का? त्यांना प्रत्येक क्षेत्रातले काही ना काही यायला नको का? स्क्रीनपासून दूर ठेवले, तरी पुढे जगाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठीची कौशल्ये आतापासूनच हळूहळू आत्मसात करण्यासाठी असे प्रयत्न करायला नकोत का?… अशा अनेकानेक प्रश्नांना उत्तरे देत पालक उपरोल्लेखित उपक्रमांत पाल्याला ढकलत राहतो. पण, परत फिरून मुद्दा एकच, की अंतिमत: याने तरी फायदा होतो का? ज्या गोष्टी, उपक्रम मनापासून करायचेच नाहीयेत, त्यात मूल ‘गुंतून’ पडू शकते का?… किती पालक स्वत:ला असा प्रश्न विचारतात?
अर्थात, स्क्रीनपासून लांब ठेवायचे, पण मुलांना या उपक्रमांतही ‘गुंतवून’ ठेवायचे नाही, असे असेल, तर मग करायचे काय, हा स्वाभाविक प्रश्न यावर उमटू शकतोच. त्याचे प्रत्येकासाठी साधे उत्तर असते, ते म्हणजे स्वत:चे बालपण आठवायचे, त्यातील आठवणखुणा ताज्या करायच्या, त्याच्या गोष्टी पाल्याबरोबर शेअर करायच्या आणि त्याला त्याच्या सुटीतल्या अशा आठवणखुणा तयार करण्यासाठी लागेल तितकी मदत करायची तयारी ठेवायची. याची तयारी म्हणजे काही रजा टाकून पूर्ण करायचा एखादा ‘टास्क’ नाही, तर पाल्याचा सुटीचा काळ सुरू आहे, हे कायम स्मरणात तेवढे ठेवायचे, इतकेच. म्हणजे मग आपला पाल्य काहीच करत नाहीये, अशी तक्रार राहणार नाही. तशीही, सुटी कधी तरी, काहीच न करण्यासाठीही असते !
आता हे काय सोपे असते का? पण, अवघड तरी असते का? साधा पत्त्यांचा पाच-तीन-दोनचा डाव खेळताना हात कसे करायचे, हे काय व्यूहरचना शिकण्यापेक्षा कमी असते? नाही झाले एखाद्या वेळी हात, तर पुढच्या वेळी त्याची भरपाई करणे, हे काय हार-जीत स्वीकारणे शिकण्यापेक्षा कमी असते? कधी आपले सगळे हात झाले असतील, तर दुसऱ्याचा व्हावा म्हणून आपला सोडून देणे, हे सहकंपेची (एम्पथी) भावना शिकण्यापेक्षा कमी असते?… कॉर्पोरेट जगतासाठीच काय, रोजच्या जगण्यातही हेच उपयोगी पडते की. किंबहुना ते आपल्या जगण्यात आहेच, याची स्वत:ला आठवण तेवढी करून द्यायची आहे. त्यासाठी खूप काही वेगळे करावे लागत नाही. शहरातल्या गल्ली-बोळांतून सायकली फिरवल्या, तर ‘गूगल मॅप्स’ची कुबडी प्रत्येक वेळी लागणार नाही आणि जेव्हा ती आवश्यक असेल, तेव्हा ती कशी वापरायची याचे अधिक चांगले आकलन होईल, हे कधी तरी आपल्या पाल्याला त्याच्याबरोबरच सायकलवरून फिरताना बोलायला हवे; टेकडी चालता चालता माती, झाडे, आकाशाचे रंग प्रकाशानुसार बदलताना बघण्याचा खेळ खेळायला हवा; टीव्हीवर क्रिकेटचा सामना बघताना कधी स्टेडियमच्या नावाचा, तर कधी एखाद्या खेळाडूचा इतिहासही गूगल करायला हवा आणि यूट्यूबवर काही पाहताना येणाऱ्या १५ सेकंदाच्या जाहिरातीमागे सर्जनशील कष्टांचे किती तास गुंतलेले असतात, याची गोष्टही सांगायला हवी… हे असे एवढे जरी केले, तरी सुटीच्या अनेक आठवणखुणा तयार होतात. दर सुटीत वेगळ्या. सुटी सत्कारणी लावणे याकडे ‘टास्क’ म्हणून पाहायचे, की जिताजागता अनुभव म्हणून, इतकाच प्रश्न खरेतर सोडवायचा आहे. सोपा नाही, कारण आपण अवघड करून ठेवला आहे. पण, तरी… करून तर पाहू!
siddharth.kelkar@gmail.com