बेळगाव येथील लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ ठाकूर यांना तिसरा ‘लोकमान्य मातृभूमी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराची रक्कम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देत असल्याची घोषणा ठाकूर यांनी या वेळी केली.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या हस्ते ठाकुर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच लाख ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराच्या रकमेमध्ये ५० हजार रुपयांची भर घालून सहा लाख रुपये महाराष्ट्र अंनिसला देत असल्याची घोषणा त्यांनी केली. ‘समाजातील चांगल्या लोकांनी बघ्याची भूमिका सोडण्याची गरज आहे. आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून आपल्या देशासाठी सर्वस्व झोकून काम केले पाहिजे’, असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ‘जडण-घडण’ मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे, युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष पी. एन. जोशी, सोसायटीचे अध्यक्ष पी. एन. पाटकर, उपाध्यक्ष आरती कुलकर्णी, शैलेश टिळक, संभाजी पाटील उपस्थित होते.