रशियाच्या नेतृत्वाची धुरा ज्यांच्या हाती आहे, त्या ब्लादिमीर पुतीन यांच्याकडे केवळ एका राष्ट्राचे प्रमुख म्हणून पाहता कामा नये. पुतीन ही व्यक्ती नाही तर, प्रवृत्ती आहे. राष्ट्रवादाची झालर देत चेहरा लोकशाहीवादी पण, निर्णय एकाधिकारशाहीचे अशा रचनेत निवडून आलेले हुकूमशहा असेच पुतीन यांचे वर्णन करावे लागते. हा पुतीनवाद आता जगभर बोकाळताना दिसत आहे, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) हिस्ट्री क्लबतर्फे आयोजित इतिहास सप्ताहात कुबेर यांचे ‘पुतीन’ या विषयावर व्याख्यान झाले. जागतिक राजकारणामध्ये पुतीन यांचा झालेला उदय यापासून ते लोकांच्या मानसिकतेचा वापर आणि सत्ताकेंद्र ताब्यात ठेवून राबविलेली एकाधिकारशाही म्हणजे पुतीनवाद असा विस्तृत पट कुबेर यांनी व्याख्यानातून उलगडला. प्रा. तनुजा खेर यांनी कुबेर यांचा सत्कार केला.

लेनिन यांनी घडविलेल्या क्रांतीने प्रथमच रशियातील झारशाहीला आव्हान दिले आणि साम्यवादाचा उगम तेथून झाला. वैयक्तिक मालकी जाऊन सामुदायिक मालकीच्या रचनेचे सर्वानाच बौद्धिक आकर्षण वाटले, याकडे लक्ष वेधून कुबेर म्हणाले, रशियाला अफगाणिस्तानमध्ये रोखण्यासाठी अमेरिकेने इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना प्रोत्साहन दिले. त्यातूनच तालिबानचा जन्म झाला आणि ओसामा बिन लादेनला अमेरिकेने पोसले. ९ नोव्हेंबर १९८९ रोजी बर्लिनची भिंत पडून जर्मनीचे एकत्रीकरण होत असताना रशियाचे खंड पडतील अशी स्थिती निर्माण झाली. आर्थिक विकासाच्या संधीचा आणि केंद्रीय सत्तेचा अभाव यामुळे रशियाची शिवण उसवायला लागली. रशियाची आण्विक शस्त्रे असलेले युक्रेन जुमेनासे झाले होते. अशा परिस्थितीमध्ये पुतीन यांचा उदय झाला. सत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो बरखास्त केले. केजीबी या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख असलेल्या पुतीन यांनी थंड डोक्याने पोखरलेल्या व्यवस्थेच्या वारूळावर बसलेल्या एकेकाला नेस्तनाबूत केले. प्रसार माध्यमांवर र्निबध आणल्यामुळे विरोधाची धार नष्ट होऊन निरंकुश सत्ता हाती आली.

घटना बदलून पुतीन यांनी अध्यक्षपद घेतले आणि विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्याने ते पुन्हा निवडून येतील. आगामी कार्यकाल ध्यानात घेतला, तर त्यांच्या अध्यक्षपदाची २४ वर्षे पूर्ण होतील. चेचेन प्रांतातील मुस्लीम बहुलांना पुतीन यांनी दहशतवादी ठरवून लष्कराला पाचारण करीत बंडखोरांना भुईसपाट केले. आर्थिक असंतोष आणि मध्यमवर्गीयांची सरकारविरोधात नाराजी निर्माण होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली. जगाला दाखविण्यासाठी निवडणुका घेऊन यशाला राष्ट्रप्रेमाची झालर लावत गेले. लोकशाहीचे हे नवे प्रारूप आता अनेक देशांतील प्रमुखांना आवडू लागल्याने पुतीनवाद वाढताना दिसत आहे, याकडे कुबेर यांनी लक्ष वेधले. विशाल निलेवाड यांनी प्रास्ताविक केले. पवन भांगे यांनी सूत्रसंचालन केले.

कास्पारोव्ह यांना देश सोडावा लागला

पुतीन यांच्या साम्राज्याला जागतिक बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह यांनी शह देण्याचा प्रयत्न केला, असे सांगून गिरीश कुबेर म्हणाले, कास्पारोव्ह यांना पाठिंबा देणाऱ्या संस्थांवर धाडी पडल्या. कास्पारोव्ह यांना जीवे मारण्याचा दोनदा प्रयत्न केला गेला. त्यामुळे ते शर्यतीतून बाहेर पडले. एवढेच नव्हे तर, रशिया सोडून त्यांना आधी स्वित्र्झलडमध्ये आणि नंतर अमेरिकेला स्थायिक व्हावे लागले. सत्ता हाती असणाऱ्यांमध्ये एक वेगळी सत्ता असते याचे हे निदर्शक आहे.