‘लोकसत्ता लोकांकिका’च्या परीक्षकांचे मत; सादरीकरणातील व्यावसायिकतेचेही कौतुक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बदलत्या काळानुसार एकांकिकांच्या स्वरूपात बदल झाला आहे. नव्या माध्यमांचा विद्यार्थ्यांच्या सादरीकरणावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. मुलांचे सादरीकरण अधिक ‘प्रोफेशन’ झाल्याचेही दिसत आहे,’ असे मत ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पुणे विभागीय अंतिम फेरीच्या परीक्षकांनी गुरुवारी व्यक्त केले.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची पुणे विभागाची अंतिम फेरी बुधवारी रंगली. या फेरीचे परीक्षण प्रसिद्ध दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत आणि प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी गिरी यांनी केले. एकांकिकाच्या सादरीकरणाची बदललेली पद्धत, विषयांची निवड याबाबत यज्ञोपवीत म्हणाले, ‘मुलांचा नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन आधुनिक आहे. त्यांच्यावर जे माध्यम येऊन आदळते, त्यानुसार एकांकिकांचा ‘फॉरमॅट’देखील बदलताना दिसतो. मोबाइलच्या स्क्रीनपासून फ्लॅट स्क्रीन टीव्हीपर्यंतची वेगवेगळी माध्यमे त्यांच्या जगात आहेत आणि एकांकिकेतही त्याचे प्रतिबिंब दिसते. जगात जे घडते त्याचे पडसाद, जातीय तेढ, सामाजिक विषय हे त्यांच्या एकांकिकांमध्ये आहेत. त्यांना हे विषय अस्वस्थ करतात हे समाधानकारक व आश्वासक आहे. काही एकांकिकांनी आपले म्हणणे ‘लाउड अँड क्लीअर’ पद्धतीने मांडण्याचे धाडस दाखवले. चकचकीत आणि धक्का देणाऱ्या तंत्रातून एकांकिका पूर्णत: बाहेर पडलेल्या नाहीत, परंतु केवळ त्यातच अडकलेल्याही नाहीत. काहीतरी नवे करण्याचे प्रयत्न होत आहेत.’

गिरी म्हणाल्या ‘तरुण मुलांचा नाटक करण्याचा उत्साह आणि ऊर्मी बघायला मिळाली. नाटकांमध्ये खूप वैविध्य होते. पुण्यात नाटय़क्षेत्रात सतत काही ना काही घडत असते, नाटके बघायला मिळत असतात. त्यामुळे इथल्या मुलांना नाटकाची आणि नाटय़स्पर्धाची सवय असते. त्यामुळे ग्रामीण भागांतील किंवा निमशहरी भागांतील मुलांच्या तुलनेत त्यांचे सादरीकरण ‘प्रोफेशनल’ आहे.’

विजेते काय म्हणतात..

सांघिक पारितोषिकांबरोबरच दिग्दर्शन, अभिनय, लेखन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत यांतील कामगिरीसाठी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली. सादरीकरणामागे काय विचार केला, तयारी कशी केली याबाबत विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद..

गिरी म्हणाल्या ‘तरुण मुलांचा नाटक करण्याचा उत्साह आणि ऊर्मी बघायला मिळाली. पुण्यात नाटय़क्षेत्रात सतत काही ना काही घडत असते,त्यामुळे इथल्या मुलांना नाटय़स्पर्धाची सवय असते. त्यामुळे ग्रामीण किंवा निमशहरी भागांतील मुलांच्या तुलनेत त्यांचे सादरीकरण ‘प्रोफेशनल’ आहे.’

प्रायोजक : ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेची महाअंतिम फेरी ‘झी युवा’ या वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर आहेत, तर ‘अस्तित्व’ या संस्थेची या स्पर्धेसाठी मदत होत आहे.

आमच्या एकांकिकेत फ्रान्समधील जुन्या काळाचे संदर्भ आहेत. तो काळ नेपथ्याच्या माध्यमातून उभा राहणे गरजेचे होते. त्यामुळे त्या ‘इरा’चा अभ्यास करावा लागला. त्यासाठी तो काळ दाखवणारे अनेक चित्रपट बघितले.

अनिल घेरडे, सवरेत्कृष्ट नेपथ्य, (३०० मिसिंग)

‘पाहुणा’ या एकांकिकेच्या संगीत दिग्दर्शनाचे पारितोषिक मला मिळाले. पारितोषिक मिळाल्याचा खूप आनंद झाला. एकांकिकेत संगीत खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. ही एकांकिका आफ्रिकन कथेवर बेतलेली होती. त्यामुळे पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचा (वेस्टन क्लासिकल म्युझिक) अभ्यास केला.

अकीब सय्यद, संगीत दिग्दर्शन, (पाहुणा)

मी प्रथमच प्रकाशयोजनेचे काम केले आहे आणि या पहिल्या प्रयत्नातच पारितोषिक मिळाल्याचा आनंद झाला आहे. नाटकाच्या सादरीकरणानुसार प्रकाशयोजना कशी करावी, याचा अभ्यास करावा लागला. महाविद्यालयातील ‘सीनियर’ विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.

शर्व सरज्योतिषी, प्रकाश योजना, (३०० मिसिंग)

माझी भूमिका एका अंध मुलीची-‘रुबा’ची होती. रुबाला एका स्फोटात अंधत्व आले आहे. त्यामुळे ती डोळ्यांची हालचाल कशी करेल, कशी चाचपडेल, कशी रडेल, हे समजून घेण्यासाठी वेगळा अभ्यास करावा लागला. अनेक दृष्टिहीन मंडळींचे निरीक्षण केले.

समृद्धी देशपांडे, सवरेत्कृष्ट   अभिनय (स्त्री), (नेकी)

जॉर्ज मेलिस’वरील एक लघुपट बघायला मिळाला आणि त्यात काही तरी नवीन आहे असे वाटले आणि नाटय़ही मिळत गेले. एकांकिकेचा काळ आणि संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे फक्त लेखक-दिग्दर्शकांनीच नव्हे, तर ‘टीम’मधील सर्वानीच बारीक अभ्यास केला. फ्रेंच भाषेच्या अनेक ्रप्राध्यपकांना भेटलो. दोन-अडीच महिने ही सर्व प्रक्रिया सुरू होती.

यश रुईकर, सवरेत्कृष्ट दिग्दर्शन, सहलेखन (३०० मिसिंग)

जॉर्ज मेलिस’च्या भूमिकेसाठी मी त्यांच्या उपलब्ध असलेल्या फिल्म पुन:पुन्हा पाहिल्या. ते हालचाली कशा करायचे, कसे वागायचे ते पाहिले. नाटकात फ्रेंच भाषेतील शब्द आहेत. त्यावर आम्हा सगळ्यांनाच खूप काम करावे लागले.

गौरव बर्वे, सवरेत्कृष्ट अभिनय (पुरुष), सहलेखन (३०० मिसिंग)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekankika pune
First published on: 09-12-2016 at 03:41 IST