पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. पुन्हा महानगर पालिकेची कोविड रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरलेली दिसत आहेत. दरम्यान, भोसरी येथील नवीन कोविड रुग्णालयातील बाधित रुग्णांनी जेवणाच्या दर्जासंर्भात ‘लोकसत्ता डॉटकॉमशी बोलताना तक्रार केली असून जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याचं म्हटलं आहे. सकाळी नाश्ता, दुपारी आणि संध्याकाळी रुग्णांना बचत गटामार्फत जेवण दिलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भोसरी येथील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची तक्रार आहे की, रुग्णांना दिलं जाणारे जेवण हे निकृष्ट दर्जाचे आहे. “डाळमध्ये डाळ कमी आणि पाणीच जास्त अशी परिस्थिती असून भाताचा दर्जाचा देखील व्यवस्थित नाही,” असं रुग्णाच म्हणणं आहे. तर, फुलके (चपाती) खूपच छोट्या आकाराच्या दिल्या जातात. चपातीला पुरेल इतकी भाजीही दिली जात नाही आणि भाताला वरण पुरत नाही अशी बिकट अवस्था असल्याचा दावा रुग्णांनी केलाय. या रुग्णालयामध्ये अन्न पुरवण्याचं कंत्राट पिंपळे गुरव येथील सावित्री महिला रोजगार संस्था बचत गटाला मिळालेलं आहे. याच महिला बचत गटाकडून रुग्णांना जेवण दिलं जात असून भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निकटवर्तीय नगरसेविका उषा मुंढे या बचतगटाला मार्गदर्शन करतात.

संबंधित बचतगटाला एका ताटामागे महानगर पालिकेकडून १८० रुपये दिले जातात. रुग्णांना दोन वेळेसचे जेवण, ज्यामध्ये वरण, भात, चपाती, भाजी, सलाड, तीन लिटर पाणी, सकाळचा नाश्ता, दोन वेळचा चहा दिला जातोय, असं नगरसेविका उषा मुंढे यांनी लोकसत्ता डॉटकॉमशी बोलताना सांगितले आहे. “चांगल्या दर्जाचे आणि घरगुती जेवण दिलं जातंय. महानगर पालिकेच्या वर्क ऑर्डरपेक्षा दुप्पट जेवण दिलं जात आहे. कमी पैशात कोणी करणारे असेल तर त्यांनी करावं,” असंही या महिला बचत गटाच्या मार्गदर्शक असणाऱ्या नगरसेविका उषा मुंढे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, चहा केव्हातरी येतो तर नाश्ता कमी मिळतो असा तक्रारदार रुग्णाचा आरोप आहे. रुग्णांचं स्वास्थ्य निरोगी रहावं आणि लवकर रुग्ण बरे व्हावे असे महानगर पालिकेला वाटत असेल तर त्यांना उत्तम दर्जाचे जेवण देणे गरजेचे आहे, असं रुग्णांचं म्हणणं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low quality food is provided to covid 19 patients in pimpri chinchwad kjp scsg
First published on: 13-03-2021 at 16:03 IST